नवी दिल्ली: देशातील दहा राज्यांमध्ये चलनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेशचा समावेश आहे. तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातही पाहायला मिळते आहे.
एबीपी माझाने मुंबईसह चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये एटीएमचा रियालिटी चेक केला. यामध्ये शहरासह उपनगरातल्या बहुतेक एटीएम सेंटरमध्ये खडखडाट पाहायला मिळाला.
कुठे रोकड संपल्याचे फलक लावले आहेत, तर कुठे मशीन नादुरुस्त असल्याचं कारण लिहिण्यात आलं आहे. त्यामुळं ग्राहकांची मोठी तारांबळ झालेली पाहायला मिळते आहे.
तिकडे अमरावतीमध्येही परिस्थिती वेगळी नाही. एटीएममध्ये पैसे नसल्यानं नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी सुरु केली आहे. एटीएममध्ये पैसे का नाही, याचं कारणंही नागरिकांना कळत नसल्यानं त्यांची मोठी धांधल उडताना पाहायला मिळते आहे.
वारंवार एटीएमच्या चकरा मारुनही पैसे मिळत नसल्याने, नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे पुन्हा एकदा नोटाबंदीच्या काळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं स्थिती आहे.
लवकरच परिस्थिती पूर्वपदावर: आरबीआय
सणासुदीच्या काळात कॅशला आलेल्या मागणीमुळे आत्ता नोटांचा तुटवडा असल्याचं सांगितलं जातंय. जितक्या नोट पुरवणं आवश्यक होतं, तितक्या नोटांचा पुरवठा झाला नाही असं रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी सांगितलंय. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. एक-दोन दिवसात परिस्थिती सामान्य होईल, असं आरबीआयने म्हटलं आहे.
बाजारात पुरेसा पैसा, लवकरच परिस्थिती नियंत्रणात : अरुण जेटली
बाजारात पुरेसा पैसा उपलब्ध आहे. बँकांमध्येही पैसे आहेत. काही ठिकाणी अचानक पैशाची मागणी वाढली. मात्र काळजी करण्याचं कारण नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांनी बैठक बोलावली
रोख रकमेचा तुटवडा जाणवत असल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज बैठक बोलावली आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात नोटांचा तुटवडा जाणवत आहे.
योगी आदित्यनाथ याबाबत देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिणार आहेत.
बिहारला सर्वाधिक फटका
नोटांचा सर्वाधिक तुटवडा बिहारला बसला आहे. अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. एबीपी न्यूजने पाटण्यातील सर्वात व्हीआयपी परिसर अर्थात राजभवन जवळच्या एटीएममध्ये तपासणी केली. मात्र तिथेही पैसे नव्हते. जर सर्वात व्हीआयपी परिसरात अशी स्थिती असेल, तर अन्यत्र काय, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.
नोटांचा तुटवडा का?
स्टेट बँकेचे बिहार विभागाचे अधिकारी मिथीलेश कुमार यांच्या माहितीनुसार, एटीएममध्ये डिपॉझिट अर्थात पैसे भरण्याचं प्रमाण काहीसं घटलं आहे. बिहारमध्ये एसबीआयचे 1100 एटीएममध्ये दररोज 250 कोटी रुपये भरले जातात, मात्र सध्या केवळ 125 कोटी रुपयेच भरले जात आहेत. त्यामुळे पैशाचा तुटवडा जाणवत आहे, असं कुमार म्हणाले.