नवी दिल्ली : हिंदी चित्रपटसृष्टीला 'बॉलिवूड' असं संबोधणं अवमानकारक आहे, त्याऐवजी नवीन पर्यायी शब्द तयार करावा, असं आवाहन भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांच्याकडे विजयवर्गीय ही मागणी करणार आहेत.
'काही दिवसांपूर्वी मी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांना भेटलो होतो. बॉलिवूड हा शब्द परदेशी मीडियाने भारतीय चित्रपटसृष्टीला हिणवण्यासाठी वापरला, असं बोलता बोलता घई म्हणाले. त्यामुळे आपण हा शब्द वापरण्यास परावृत्त करायला हवं. आपण हॉलिवूडची भ्रष्ट कॉपी आहोत, असं वाटतं. खरं तर आपल्याकडे दादासाहेब फाळके, सत्यजीत रे यांच्यासारखे दिग्गज होऊन गेले. त्यामुळे बॉलिवूड म्हणून हिणवलं जाणं स्वाभिमानाला धक्का पोहचवणारं आहे.' असं कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
'बॉलिवूड.. त्याचप्रमाणे कॉलिवूड, मॉलिवूड अशी त्याची प्रादेशिक नावं वापरणं बंद व्हावं. याऐवजी त्या-त्या भाषेच्या नावाचा वापर व्हावा, यासाठी राठोड यांनी पावलं उचलावीत, अशी मागणी करणारं पत्र मी लिहिणार आहे.' असंही विजयवर्गीयांनी सांगितलं.
'1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने भारतीय चित्रपटसृष्टीला 'औद्योगिक दर्जा' प्रदान केला. त्यामुळे माफिया आणि अवैध आर्थिक पुरवठ्यापासून सिनेसृष्टीची मुक्तता झाली. चित्रपट निर्मितीसाठी आता संस्थात्मक वित्त पुरवठा होतो.' अशी माहितीही विजयवर्गीयांनी दिली.
कैलाश विजयवर्गीय यांचं संगीत-चित्रपट प्रेम सर्वश्रुत आहे. मध्य प्रदेशात इंदोरमध्ये आयोजित होळी उत्सवात त्यांनी हॉलिवूडचे सुपरस्टार एल्विस प्रेस्ली यांची वेशभूषा केली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवूड म्हटल्याने अपमान : विजयवर्गीय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jun 2018 09:10 AM (IST)
बॉलिवूड हा शब्द परदेशी मीडियाने भारतीय चित्रपटसृष्टीला हिणवण्यासाठी वापरला, त्याऐवजी नवीन पर्यायी शब्द तयार करावा, असं आवाहन भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -