नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र त्यानंतर झालेल्या सर्व पोटनिवडणुकांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात भाजपचा पराभव झाला. यामुळे उत्तर प्रदेशात आता सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे.


योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या नोएडा दौऱ्याबाबत या चर्चा आहेत. नोएडाबाबत असलेल्या सर्व अंधश्रद्धांना दूर ठेवत योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मेट्रोच्या उद्घाटनासाठी गेले.

योगींचं नोएडाला जाणंच पक्षाला भारी पडलं असल्याचं कैराना लोकसभा पोटनिवडणुकीनंतर म्हटलं जात आहे. भाजपच्या या पराभवाला आता सोशल मीडियाद्वारे नोएडाच्या अंधश्रद्धेबद्दल जोडलं जात आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नोएडा दौऱ्याहून आल्यापासून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात भाजपला एकही विजय मिळालेला नाही. अगोदर योगींचं होमग्राऊंड असलेल्या गोरखपूर आणि फुलपूरमधील पराभव आणि आता कैराना लोकसभा आणि नुरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला.

काय आहे नोएडा प्रकरण?

मुख्यमंत्री असताना अखिलेश यादव कधीही नोएडाला गेले नाही. अखिलेश यांच्यापूर्वी मायावती नोएडाला गेल्या, तर 2012 साली त्यांनी सत्ता गमावली. याची सुरुवात 1980 मध्ये वीर बहादूरसिंह यांच्या कार्यकाळापासून झाली, जे नोएडाला गेले आणि नंतर खुर्ची गमावली. मुलायम सिंह यादव 2003 साली नोएडाला गेले, तर 2007 साली त्यांनी सत्ता गमावली.

दरम्यान, ही एक अंधश्रद्धा असली तरी सोशल मीडियावर भाजपच्या पराभवाला नोएडाशी जोडलं जात आहे. अखिलेश यादव कधीही नोएडाला गेले नाहीत, तरीही त्यांना सत्ता गमवावीच लागली. मात्र असं असलं तरी आता उत्तर प्रदेशात या अंधश्रद्धेमुळे भाजपविरोधात जोक व्हायरल होत आहेत.