Project Cheetah : कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते (Project Cheetah) सोडण्यावरून आता वाद सुरु झाला असून, संतप्त बिष्णोई समाजाने याचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. अखिल भारतीय बिष्णोई महासभेचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांची भूक भागवण्यासाठी राजगडच्या जंगलातून श्योपूरला 181 चितळं पाठवण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.


यानंतर आता हरियाणातील फतेहाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बिष्णोई समाजाच्या लोकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.


बिष्णोई समाजाचे धरणे आंदोलन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आयात केलेले चित्ते सोडण्यात आले आहेत. या चित्त्यांवरून आता वाद सुरू झाला आहे. प्राण्यांच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे असणाऱ्या बिष्णोई समाजाने या चित्त्यांच्या खाद्यासाठी कुनो राष्ट्रीय उद्यानात चितळ आणि हरिण सोडल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. या विरोधात बिष्णोई समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाबाबत बिष्णोई समाजाच्या लोकांनी हरियाणातील फतेहाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र


अखिल भारतीय बिष्णोई महासभेचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांची भूक भागवण्यासाठी राजगडच्या जंगलातून श्योपूरला 181 चितळं आणि हरिण पाठवण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.


देवेंद्र बुडिया यांनी पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारत सरकारने आपल्या नेतृत्वाखाली भारतातील जंगलांमधील नामशेष झालेल्या प्रजाती पुनर्संचयित करण्यासाठी नामिबियामधून 8 चित्ते आणले आहेत. परंतु, त्यांचे खाद्य मुख्यत्वे चितळ, हरणे इत्यादी जंगलात सोडल्याने बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.


70 वर्षांनंतर चित्ते भारतात!


तब्बल 70 वर्षांनंतर भारत देशात चित्ते परतले आहेत. यापूर्वी 1952 मध्ये देशातून चित्ताची प्रजात नष्ट झाली होती. भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली देशात पुन्हा चित्ते आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर यंदा 2022 मध्ये हा प्रोजेक्ट चित्ता पूर्णत्वास आला आहे. या प्रोजेक्ट चित्तासाठी भारत सरकारने सुमारे 90 ते 92 कोटी खर्च केल्याचं बोललं जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या