नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देऊन, भारताला आधुनिक जगाची कवाडं उघडून देणाऱ्या माजी पंतप्रधान 'भारतरत्न' राजीव गांधी यांची आज जयंती आहे. 20 ऑगस्ट 1944 रोजी राजीव गांधी यांचा जन्म झाला. सुरुवातीला राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिलेले राजीव गांधी, पुढे संजय गांधींच्या अपघाती निधनानंतर राजकारणात प्रवेश केला, पुढे ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधानही झाले. भारताला संगणकयुगात आणण्यासाठी धडपणारा हा तरुण नेता भारतीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण करुन गेला...
राजीव गांधी यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे :
1. राजीव गांधी यांचा यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. राजीव गांधी यांचं नाव त्यांचे आजोब म्हणजे पंडीत जवारहलाल नेहरु यांच्या पत्नीच्या नावावरुन ठेवण्यात आले. पंडीत नेहरुंच्या पत्नीचे नाव कमला नेहरु. कमला म्हणजे लक्ष्मी आणि ‘राजीव’ हे सुद्धा कमळाचे दुसरे नाव. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या या पहिल्या मुलाचे नाव ‘राजीव’ ठेवण्यात आले.
2. राजीव गांधी हे ‘फ्लाईंग क्लब’चे सदस्य होते. त्यांनी तेथे सिव्हिल एव्हिएशनचं प्रशिक्षण घेतलं. 1970 साली एअर इंडियामध्ये कामाला सुरुवात करणाऱ्या राजीव गांधी यांनी 1980 साली राजकारणात प्रवेश केला.
3. राजीव गांधी यांना कॉम्प्युटर, गॅजेट्स यांमध्ये अधिक रस होता. पंतप्रधान म्हणूनही त्यांनी देशात तंत्रज्ञानासंबंधी विकासात पुढाकार घेतला. तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला ताकदवान बनवण्याचं त्यांनी कायम स्वप्न बाळगलं आणि ते पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णयही घेतले. भारताला संगणकयुगात आणणारा पंतप्रधान म्हणूनही त्यांची ओळख आहे.
4. 1981 साली राजीव गांधी यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली.
5. राजीव गांधी हे भारताचे आजवरचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.
6. राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने 1984 साली ऐतिहासिक विजय मिळवला होता. लोकसभेच्या 542 जागांपैकी काँग्रेसला 411 जागा मिळाल्या होत्या.
7. बोफोर्स घोटाळा, भोपाळ दुर्घटनेतील मुख्य आरोपी वॉरेन अँडरसनचं देशाबाहेर पलायन इत्यादी गोष्टींवरुन राजीव गांधी यांच्यावर आरोपही झाले. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असणाऱ्या व्ही. पी. सिंग यांनी बोफोर्स प्रकरण बाहेर काढलं. त्यानंतर व्ही. पी. सिंग यांच्यावर कारवाई करण्यात आली. आधी मंत्रिमंडळातून बाहेर, मग काँग्रेसमधूनही त्यांना बाहेर काढण्यात आले.
8. डिजिटल क्रांतीसह राजीव गांधी यांनी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. 1986 साली राजीव गांधी यांनी ‘जवाहर नवोदय विद्यालय योजना’ ही महत्त्वपूर्ण योजना आणली. 6 वी ते 12 वी पर्यंत मोफत निवासी शिक्षणाची तरतूद या योजनेत होती. या योजनेची सर्वच स्तरातून स्तुती झाली होती.
9. 1988 साली राजीव गांधी यांनी लिट्टेविरोधात लढण्यासाठी श्रीलंकेच्या मदतीसाठी शांतीसैनिक पाठवले. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली.
10. 21 मे 1991 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान चेन्नईजवळ लिट्टेने मानवी बॉम्बचा वापर करत, राजीव गांधी यांची हत्या केली. त्यानंतर लिट्टेला भारताने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. पुढे जगातील 32 देशांनी लिट्टेला दहशतावादी संघटना म्हणून घोषित केली.
जयंती विशेष : राजीव गांधी यांच्या आयुष्यातील 10 महत्त्वाचे टप्पे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2018 10:48 AM (IST)
सुरुवातीला राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिलेले राजीव गांधी, पुढे संजय गांधींच्या अपघाती निधनानंतर राजकारणात प्रवेश केला, पुढे ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधानही झाले. भारताला संगणकयुगात आणण्यासाठी धडपणारा हा तरुण नेता भारतीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण करुन गेला...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -