अकाली दल हरियाणात स्वबळावर निवडणूक लढणार
एबीपी माझा वेब टीम | 19 Aug 2018 11:44 PM (IST)
शिरोमणी अकाली दलने हरियाणामध्ये 2019 ची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. शिरोमणी अकाली दल हा एनडीएचा जुना मित्रपक्ष आहे.
चंदीगड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच भाजपप्रणित एनडीएसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. शिरोमणी अकाली दलाने हरियाणामध्ये 2019 ची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. शिरोमणी अकाली दल हा एनडीएचा जुना मित्रपक्ष आहे. अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी हा स्वबळाचा नारा दिला. पंजाबमध्ये आम्ही वचन दिलं असून ते पूर्ण केलं. आता हरियाणाच्या कल्याणाची जबाबदारी घेण्यासाठी सज्ज आहोत, असं सुखबीर सिंह बादल यांनी कुरुक्षेत्र येथील सभेत जाहीर केलं. अकाली दलच्या झेंड्याखाली एकत्र येत एक नवा इतिहास लिहिण्याचं आवाहन सुखबीर सिंह बादल यांनी केलं. पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल सत्तेत एकत्र होते. अकाली दल हा पंजाबमधील मोठा पक्ष आहे. एकीकडे विरोधक एकवटत असताना एनडीएतील एका महत्त्वाच्या मित्रपक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. यापूर्वीच शिवसेनेनेही स्वबळाचा नारा दिला आहे. तर आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष टीडीपीनेही एनडीएसोबत फारकत घेतली आहे.