Manipur New CM:  मणिपूरमध्ये भाजप आमदारांच्या बैठकीत एन बीरेन सिंह यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे लागोपाठ दुसऱ्यांदा बीरेन सिंह मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. भाजप आमदारांच्या बैठकीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि किरेन रिजिजू पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत एन. बीरेन सिंह यांची विधिमंडळाचे नेते म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याचा सस्पेन्स संपला आहे.  


बैठकीनंतर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, मणिपूरमध्ये भाजप आमदारांच्या बैठकीत एन बीरेन सिंह यांची निवड सर्वांच्या सहमतीने झाली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये स्थिर आणि जबाबदार सराकर स्थापन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पूर्वोत्तर राज्यांवर विशेष लक्ष आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणूकीत भाजपने 60 पैकी 32 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. 2017 मध्ये भाजपने 21 जागा असतानाही एनपीपी आणि एनपीएफ या पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. 2017 मध्ये काँग्रेसने 28 जागांवर विजय मिळवला होता. 2022 मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.  










नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपने मणिपूरमध्येही मोठा विजय मिळवला होता. आता पंजाब वगळता भाजपने चार राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर मणिपूरमध्ये एन बीरेन सिंह मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. उत्तराखंडमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पुष्कर धामी व त्रिवेंद्र रावत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तराखंडमध्ये (uttarakhand) पुष्करसिंग धामी यांचा पराभव झाल्यामुळे सस्पेंस कायम आहे. गोव्यात प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रिपदी फेरनिवड झाली आहे.