Covid Vaccination : कोविड प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर कमी करण्याची शिफासर एनटीएजीआय ग्रुपने केली आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर सध्या 12 ते 16 आठवडे इतके आहे. यामध्ये घट करुन कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 8 ते 16 आठवडे करण्याची शिफारस करण्यात आली आहे. लसीकरणावर एनटीएजीआयने (National Technical Advisory Group on Immunisation) आतापर्यंत भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या लसीमधील अंतरात बदल करण्याचा कोणतीही सूचना केलेली नाही. कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर 28 दिवस इतके आहे.
राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण अभियानाअंतर्गत कोविशिल्डबाबत केलेल्या शिफारसी अद्याप लागू केलेल्या नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "एनटीएजीआयच्या नवीन शिफारस प्रोग्रामेटिक डेटामधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आहे. जागतिक स्तरावरील माहितीच्या आधारावर शिफारस करण्यात आली आहे. " एनटीएजीआयने केलेल्या शिफारसीनुसार, कोविशिल्डची दुसरी डोस आठ आठवड्यानंतर दिल्यास, शरिरातील अँटिबॉडी 12 ते 16 आठवड्यात सक्रीय होतील.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर Covishield लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी केल्यास लसीकरणाला आणखी वेग मिळेल. केंद्र सरकारने 13 मे 2021 रोजी एनटीएजीआयच्या शिफारसीनंतर Covishield लसीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यावरुन 12 ते 16 आठवडे केले होते.
आतापर्यंत 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात 15 लाख 34 हजार 444 डोस देण्यात आले. आतापर्यंत 181 कोटी 27 लाख 11 हजार 675 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक (2,17,33,502) प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत.
देशात आजही कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 1761 नवे रुग्ण
देशात आजही कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे एक हजार 761 नवीन रुग्ण आढळले असून 127 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 2 हजार 75 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 7 हजार 841 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात देशात 3 हजार 196 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णाची संख्या 26 हजार 240 इतकी झाली आहे. तसेच कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 16 हजार 479 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 65 हजार 122 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.