Karnataka Hijab Controversy : हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सरन्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांना आथा वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर, धमकी देणाऱ्या दोन आरोपींना तामिळनाडू पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. तिरुनेलवेली येथे कोवई रहमतुल्लाला अटक करण्यात आली, तर 44 वर्षीय एस जमाल मोहम्मद उस्मानी याला तंजावरमध्ये ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने हिजाब प्रकरणी निर्णय देताना वर्गात हिजाब घालण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली आहे. 


कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आपल्या निकालात म्हटले की, हिजाब हा इस्लामचा अत्यावश्यक भाग नाही आणि हिजाबवर बंदी घालणे योग्य आहे. न्यायालयानेही कर्नाटक सरकारचा 5 फेब्रुवारीचा आदेश कायम ठेवला असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांनी अनिवार्य केलेल्या ड्रेस कोडचे पालन करण्यास सांगितले आहे.


तामिळनाडूमध्ये 'या' निर्णयाचा निषेध
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तमिळनाडूमध्ये अनेक धार्मिक अल्पसंख्याक समुदाय संघटना निदर्शने करत आहेत. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये गुरुवारी अशाच एका निषेध सभेची व्हिडिओ क्लिप दोन दिवसांनी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यात तामिळनाडू तौहीद जमात (TNTJ) लेखापरीक्षण समितीचे सदस्य कोवई रहमतुल्ला यांनी कथितपणे असे म्हटले आहे की, 'चुकीचा निकाल देणार्‍या न्यायाधीशाची झारखंडमध्ये मॉर्निंग वॉक दरम्यान हत्या करण्यात आली होती.' 


'आमच्या समाजात भावनाप्रधान लोक आहेत', असे सांगत त्यांनी न्यायाधीशांना अप्रत्यक्षपणे धमकी दिली. टीएनटीजे मदुराईचे जिल्हाध्यक्ष हबीबुल्ला आणि उपाध्यक्ष असन बादशाह या सभेचे आयोजन करणारे आणखी दोन जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


तंजावरमधील पोलिसांनी शुक्रवारी TNTJ मुख्यालयाचे अध्यक्ष एस. जमाल मोहम्मद उस्मानी आणि तंजावर जिल्ह्याचे नेते राजिक मोहम्मद यांना कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी अटक केली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha