Bihar Election 2020 : जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची एनडीएचे विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. हा निर्णय एनडीच्या विधायक दलाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. आज संध्याकाळी नितीश कुमार राज्यपालांकडे बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकतात. तसेच उद्या सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार मोदी यंदा बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशील कुमार मोदींना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. असं सांगितलं जात आहे की, सुशील मोदी यांना दुसरी जबाबदारी देत. उपमुख्यमंत्री पदाचा मान एखाद्या दुसऱ्या नेत्याला दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे जेडीयूबाबत बोलायचं झालं तर त्यांचे आठ मंत्र्यांचा निवडणूकीत पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षाला नव्या आमदारांचाही विचार करावा लागणार आहे. दरम्यान, बिहारच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.


नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात दिसणार नवे चेहरे


बिहारच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या खांद्यावर देण्यात येणार आहे. परंतु, यंदा त्यांच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या वेळीच्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा भाजपने जेडीयूपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. याच कारणामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात भाजपचा बोलबाल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नियमांनुसार, बिहारच्या विधानसभा जांगांनुसार, जवळपास 36 मंत्री निवडण्यात येण्याची शक्यता आहे.


दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने 74 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा भाजपने 21 अधिकच्या जागांवर विजय मिळवला आहे. तसेच जेडीयूच्या विजयी उमेदवारांच्या संख्येत गेल्या वेळीच्या तुलनेत घट झाली असून यंदा जेडीयूला 43 जागांवर विजय मिळवता आला आहे.


एकीकडे एनडीएमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत वेगाने हालचाली सुरु आहेत. तर दुसरीकडे विरोध पक्षांकडून अद्यापही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. आरजेडीचं म्हणणं आहे की, बिहारच्या जनतेनं बदल घडवून आणण्यासाठी मतदान केलं आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी जनतेच्या आदेशाचा सन्मान करावा.


महत्त्वाच्या बातम्या :