पाटणा : महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेची बाजू घेणाऱ्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. प्रज्ञासिंहचं वक्तव्य सहनशक्तीच्या पलिकडचं आहे, अशी टीका नितीश कुमार यांनी केली.


साध्वी प्रज्ञासिंहचं वक्तव्य सहन करण्यापलिकडचं आहे. भाजपने तिची तातडीनं पक्षातून हकालपट्टी करण्याबाबात विचार केला पाहिजे. कारवाई करणे पक्षाचं (भाजप) काम आहे. मात्र हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. आम्ही गुन्हेगारी, भ्रष्टाचार या मुद्द्यावर तडजोड करु शकत नाही, हे आमचं मत आहे, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली.



काय होतं प्रकरण?


मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्याला प्रज्ञासिंह ठाकूरने प्रत्युत्तर दिलं. गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. त्यानंतरच देशात दहशतवादाची सुरुवात झाल्याचं हासन म्हणाले होते. यावर साध्वी प्रज्ञा सिंहची प्रतिक्रिया विचारली असता 'नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला दहशतवादी म्हणवणाऱ्यांनी आधी अंतरंगात डोकावून पाहावं. अशा लोकांना निवडणुकीत योग्य उत्तर मिळेल', असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंहने केलं होतं.


VIDEO : नथुराम गोडसे देशभक्त होते आणि राहतील, साध्वी प्रज्ञांचं वक्तव्य



साध्वीचा माफीनामा


सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर नथुराम गोडसे देशभक्त असल्याच्या वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहने माफीनामा मागितला. "मी रोड शोमध्ये होते. भगव्या दहशतवादाशी संबंधित प्रश्न मला विचारण्यात आला. मी चालता चालता तातडीने उत्तर दिलं. माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता, मी माफी मागतो. गांधीजींनी देशासाठी जे काही केलं आहे, ते विसरता येण्यासारखं नाही. मी त्यांचा अतिशय आदर करते. मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मी पक्षाची शिस्त पाळणारी कार्यकर्ता आहे. जे पक्षाचे विचार आहेत, तेच माझे विचार आहेत."


कोण होता नथुराम गोडसे?


नथुराम गोडसेने पुण्याजवळ बारामती येथे प्राथमिक शिक्षण घेतले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी त्याने हायस्कूलचे शिक्षण मध्यावरच सोडलं. नथुराम गोडसे सुरुवातीला अखिल भारतीय काँग्रेसमध्ये सक्रिय होता. मात्र नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि 1930 अखिल भारतीय हिंदू महासभेत गेला.


भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची फाळणी झाली त्यावेळी झालेल्या धार्मिक दंगलींमुळे नथुराम गोडसे दु:खी झाला होता. या दंगलींसाठी नथुराम गोडसे महात्मा गांधींना जबाबदार मानत होता. त्यामुळेच त्याने चिडून आपल्या साथीदारांसह महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचला.


त्यानुसार 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने दिल्लीतील बिर्ला भवनात गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली. गांधींजींच्या हत्येप्रकरमी नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटेला 15 नोव्हेंबर 1949 रोजी पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली.


आणखी वाचा