भुवनेश्वर: पाच फूट दोन इंचाचा माणूस...आपल्या कारमधून भुवनेश्वरला जात होता. अचानक पोलिसांच्या ताफ्याने त्याच्या कारला वेढा घातला. तब्बल आठ महिन्यानंतर तो पोलिसांच्या हाती सापडला होता. ही कोणत्या फिल्मची कथा नाही तर ओडिसातील एका ठगाची... तोही साधासुधा नाही तर तब्बल 27 उच्चशिक्षित महिलांना गंडा घालणारा. बिभू प्रकाश स्वैन असं या ठगाचं नाव असून त्याने दहा राज्यांतील 27 महिलांशी लग्न केलं आहे आणि त्यांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. 


बिभू प्रकाश स्वैन हा मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून महिलांशी ओळख करायचा. त्यामध्ये खासकरून घटस्फोटीत आणि विधवा महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. त्यानंतर त्यांच्याशी तो लग्न करायचा आणि त्यांचे पैसे घेऊन फरार व्हायचा. अशा पद्धतीने त्याने दहा राज्यातील 27 महिलांना गंडा घातला आहे. 2006 साली त्याने बोगस क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केरळमधील दहा बँकाची जवळपास एक कोटी रुपयांची फसवणूक त्याने केल्याचं समोर आलं आहे. तसेच हैदराबादमध्ये मुलांना एमबीबीएसची जागा मिळवून देतो असं सांगत त्यांच्या पालकांना दोन कोटी रुपयांचा गंडाही त्याने घातला आहे.


मे 2021 मध्ये त्याच्या एका पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आयपीसी कलम  498 (A), 419, 468, 471 आणि 494 अंतर्गत वेगवेगळे गुन्हे नोंद केले होते. त्या आधारेच बिभू प्रकाश स्वैनला अटक केली आहे. आता त्याला भूवनेश्वरमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. 


27 बायका...त्याही उच्च शिक्षित
बिभू प्रकाश स्वैन हा काही सामान्य ठग नसल्याचं समोर आलं आहे. त्याने बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या असिस्टंट कमांडंट पासून ते छत्तीसगडमधील शिक्षक महिलांना गंडा घातला आहे. या सर्वांशी लग्न करुन तो त्यांचे पैसे घ्यायचा आणि फरार व्हायचा. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील दोन वकील महिलांचा समावेश आहे. तसेच आसाममधील डॉक्टर, दिल्लीतील शिक्षिका, इंदोरमधील सरकारी अधिकारी, केरळातील प्रशासकीय अधिकारी यांच्यासह सीए महिला आणि इतर उच्च शिक्षित महिलांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. 


बिभू प्रकाश स्वैन याने Jeevansathi.com, Shaadi.com आणि Bharatmatrimony.com या प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून या महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा, त्यांच्याशी लग्न करायचा आणि नंतर पैसे घेऊन फरार व्हायचा. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha