Bhopal Gas Tragedy : भोपाळ गॅस दुर्घटनेला 37 वर्षे पूर्ण झाली. 2 डिसेंबर 1984 च्या मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेच्या जखमा आजही ताज्या आहेत. जगातील औद्योगिक इतिहासातील ही सर्वात मोठी दुर्घटना होती. मध्य प्रदेशातील भोपाळमधील युनियन कार्बाईड या कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामधून मिथाईल आयसोसायनेट (MIC) या विषारी वायूची गळती झाली. या दुर्घटनेनं त्या दिवसापासून आतापर्यंत हजारोंचा जीव घेतलाय. युनियन कार्बाईडच्या प्लांट - सीमध्ये पहाटे गॅस गळती सुरू झाली आणि वाहत्या वाऱ्यासोबत हा विषारी गॅस भोपाळ शहरात पसरला आणि गाढ झोपेतील लोकांचा बळी गेला. लोक श्वास घेण्यासाठी तडफडू लागले. युनियन कार्बाईड फॅक्टरीतून सुमारे 40 टन वायूची गळती झाली होती.
2 डिसेंबर 1984 च्या पहाटे झालेल्या विषारी वायूच्या गळतीने होत्याचं नव्हतं झालं. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गॅस दुर्घटनेत काही तासांमध्येच जवळपास 3,000 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, विनासरकारी स्रोतांच्या माहितीनुसार या दुर्घटनेत सुमारे 25 ते 30 हजार लोकांचा बळी गेला. एवढंच नाही मृत्यूचं हे सत्र पुढील अनेक वर्षे सुरु होतं. त्यानंतरही मागील 35 वर्षात अनेक लोकांचा बळी गेला आणि कित्येक माणसं अपंग झाली.
कशी घडली दुर्घटना?
मिथाईल आयसोसायनाईट (MIC) या विषारी रसायनाचा वापर कीटकनाशके आणि प्लास्टिक निर्मिती करण्यासाठी वापरले जाते. MIC द्रवरुपात थंड वातावरणात हातळला जातो. या रसायनाचा पाण्याशी संपर्क आल्यास रासायनिक अभिक्रिया होऊन विषारी वायू तयार होतो. युनियन कार्बाईड कारखान्यातील 610 क्रमांकाच्या टाकीतील मिथाईल आयसोसायनाईटचा पाण्याशी संपर्क आला. कारखान्यातील कामगाराने या टाकीवर बसवलेल्या व्हाल्व्हच्या पुढील पाईप पाण्याने धुण्यासाठी पाण्याची नळी व्हाल्व्हपुढच्या नळीला जोडली होती. व्हाल्व्ह गळका असल्याने त्यातून पाणी टाकीत गेले. त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन टाकीचे तापमान आणि दाब वाढू लागल्याने सेफ्टी व्हॉल्ह उघडून विषारी वायूची गळती झाली.
हजारो निरपराध लोकांचा बळी
विषारी वायूची गळती झाली तेव्हा भोपाळ आणि आसपासच्या शहरातील लोक गाढ झोपेत होते. विषारी वायूमुळे त्यांचा जीव कासावीस व्हायला लागला. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानं लोक तडफडू लागले. काहींचा झोपेतच मृत्यू झाला तर काहीजण कसेतरी रुग्णालयात पोहोचले. मात्र रुग्णालयात काय उपचार करावेत हेच डॉक्टरांना माहित नव्हते. त्यानंतर संपूर्ण भोपाळमध्ये माणसांसह जनावरांच्या मृतदेहांचा खच पडला. या घटनेची दाहकता इतकी होती की, या दुर्घटनेचा त्रास त्यानंतर जन्मलेल्या तिसऱ्या पिढीतील लोकांपर्यंत पोहोचला. अनेकांना अपंगत्व, अंधत्व आलं.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- The Railway Men : भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित नवी वेब सीरिज; आर माधवनची प्रमुख भूमिका
- Jammu Kashmir News: पुलवामासारख्या हल्ल्याच्या तयारीत होते दोन दहशतवादी, भारतीय लष्कराने थोपवला नापाक हल्ला
- Omicron Variant Cases in India : भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव, कर्नाटकात व्हेरियंटचे दोन रुग्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha