Terrorists Killed In J&K: पुलवामासारखाच हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने आज सकाळी खात्मा केला. या हल्ल्यासाठी बेकायदेशीरपणे 40 किलोपेक्षा जास्त स्फोटके जमवली होती. शिवाय हे दान्ही दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये निष्पाप लोकांनाही लक्ष्य बनविण्याच्या तयारीत होते. 


 
फुरकान आणि यासीरचे इरादे होते खतरनाक  
लष्कराकडून मारण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांचे इरादे खूप खतरनाक होते. फुरकान आणि यासीर अहमद पारे अशी या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत. यातील फुरकान हा लोकांना फसवून आपले इरादे पूर्ण करण्याच्या तयारीत होता. तो यात  बऱ्यापैकी यशस्वीही झाला होता. याबरोबरच यासीर हा फुरकानच्या इशाऱ्यावरून स्थानिक लोकांच्या हत्या करत होता. 
 
पाकिस्तानच्या नापाक इराद्याचा भाग होता फुरकान
गुप्तचर यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, फुरकान हा पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आणि दहशतवादी संघटना लश्कर ए-तैयबाच्या म्होरक्यांच्या सतत संपर्कात होता. शिवाय जम्मू-काश्मीरमधील निष्पाप लोकांना मारण्यात आलेल्या योजनेचा तो एक भाग होता. लष्कर गेल्या आठ महिन्यांपासून या दोघांच्या शोधात होते. भारतात पुलवामासारखाच हल्ला करण्याची हे दोघे जण तयारी करत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. 
 
 
पुलवामाजवळच घडवणार होते दुसरी घटना 
गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, फुरकान आणि यासीर पुलवामाजवळच हा स्फोट घडवणार होते. त्यासाठी या दोघांनी  ऐरीगम लेसीपूर रस्त्यावर रेकी पण केली होती. यासीर पारे हा पुलवामा येथीलच राहणारा असल्याने हल्ल्यासाठी त्यांनी हेच ठिकाण पुन्हा निवडले होते. त्याला येथील स्थानिकांचा पाठिंबाही मिळू शकत होता. आपला इरादा पूर्ण करण्यासाठी या दोघांनी 40 किलो पेक्षा जास्त स्फोटके मिळवली होती. पारे हा आयडी एक्सपर्ट मानला जात होता. तो खूप कमी वेळेत आयडी तयार करण्यात पटाईत होता. लष्कराला बुधवारी सकाळीच या लोकांच्या लपण्याच्या जागेची माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कराने केलेल्या कारवाईत दोघांनाही मारण्यात यश आले. 
 
जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांच्या म्हणण्यानुसार, हे दहशतवादी स्थानिक लोकांना मारण्याच्या तयारीत होते. त्यामुळेच या दोघांवरही लाखो रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. कारवाईत मारल्यानंतर त्यांच्यापासून काही शस्त्रे आणि महत्वपूर्ण गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. 
 
40 किलो स्फोटकांच्या शोधात आहेत तपास यंत्रणा 
 यासीर आणि फुरकानच्या खात्म्यानंतर त्यांच्याजवळील 40 किलो स्फोटकांच्या शोधात तपास यंत्रणा आहेत. याच स्फोटकांचा वापर करून दुसरीकडे हल्ला होवू नये यासाठी तपास यंत्रणा स्फोटकांचा कसून शोध घेत आहेत. 



संबंधित बातम्या
Facebook कडून धोकादायक दहशतवादी, कट्टरपंथीय संघटना काळ्या यादीत, पाहा यादी


दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणारा झाकीर शेख अँथोनीच्या संपर्कात, हा अँथोनी कोण?