नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा 'भारतरत्न'ने सन्मान होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' यांची घोषणा करण्यात आली आहे.
प्रणव मुखर्जी हे भारताचे तेरावे राष्ट्रपती होते. यूपीए 2 कार्यकाळात म्हणजेच 25 जुलै 2012 रोजी प्रणव मुखर्जी यांनी पद ग्रहण केलं होतं. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. 25 जुलै 2017 रोजी ते राष्ट्रपतीपदावरुन पायउतार झाले. मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी रा. स्व. संघाच्या मंचावर हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
प्रणव मुखर्जी यांचा परिचय
प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी झाला. 1969 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. इंदिरा गांधी (1982-84) आणि मनमोहन सिंग (2009-12) यांच्या कार्यकाळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रिपद भूषवलं होतं. नरसिंह राव (1995-96) यांच्या कार्यकाळात ते परराष्ट्रमंत्री होते, तर मनमोहन सिंग (2004-06) यांच्या कार्यकाळात ते संरक्षणमंत्री होते.
भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने 2008 साली 'पद्मविभूषण'ने सन्मानित केलं होतं.
नानाजी देशमुख यांचा परिचय
चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख (11 ऑक्टोबर, 1916 - 27 फेब्रुवारी 2010) मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. सरकारने याआधी त्यांच्या कार्याचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. 1997 मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली.
हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी जन्मलेल्या नानाजींनी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्य केलं. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्र्वत विकास साधणारे समाजकार्य करायचे ठरवले.
भूपेन हजारिका
भूपेन हजारिका (8 सप्टेंबवर 1926 - 5 नोव्हेंबर 2011) आसाममधील प्रसिद्ध गीतकार, संगीतकार आणि गायक होते. याशिवाय ते कवी, चित्रपट निर्माते, लेखक आणि आसामच्या संस्कृतीचे अभ्यासक होते.
भूपेन हजारिका यांचा जन्म आसाममधील तिनसुकीया जिल्ह्यातील सदिया गावात झाला. 1946 मध्ये हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रातून पदवी मिळवली. त्यानंतर न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएचडीचं शिक्षण घेतलं.
भूपेन हजारिका यांना 1975 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने तर 1992 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरव करण्यात आला.
आतापर्यंतचे भारतरत्न
तब्बल चार वर्षांनंतर 'भारतरत्न' पुरस्कारांची घोषणा झाली आहे. 2015 साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न बहाल करण्यात आला होता. त्याचवेळी मदन मोहन मालवीय यांनाही मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. 2014 मध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि शास्त्रज्ञ सीएनआर राव, तर 2008 मध्ये पं. भीमसेन जोशी यांचा भारतरत्नने सन्मान करण्यात आला होता.
प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना 'भारतरत्न'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2019 08:50 PM (IST)
प्रणव मुखर्जी हे भारताचे तेरावे राष्ट्रपती होते. यूपीए 2 कार्यकाळात म्हणजेच 25 जुलै 2012 रोजी प्रणव मुखर्जी यांनी पद ग्रहण केलं होतं. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -