नवी दिल्ली: केंद्रीय तपास संस्थेने (CBI) ब्रिटनमधील केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीवर फेसबुक डेटा चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीने फेसबुकवरुन 5.62 लाख भारतीयांचा डेटा चोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं की फेसबुक-केंब्रिज अॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणाचा तपास आता सीबीआय करेल.


सीबीआयने दाखल केलेला हा गुन्हा गेल्या दोन वर्षाच्या प्राथमिक तपासाच्या आधारे दाखल करण्यात आले आहे. सीबीआयने हा प्राथमिक तपास सप्टेंबर 2018 साली सुरु केला होता. त्यावेळी केंद्र सरकारने केंब्रिज अॅनालिटिकाला एक नोटिस पाठवली होती. भारतीयांच्या चोरी करण्यात आलेल्या फेसबुक डेटाचा वापर कशा प्रकारे करण्यात आला आहे आणि या अवैध कामात आणखी कोणत्या संघटना गुंतल्या आहेत अशा प्रकारचा प्रश्न सरकारने त्या नोटिसच्या माध्यमातून विचारला होता.


Whatsapp म्हणतं, 'आम्हाला काळजी तुमच्या गोपनीयतेची', व्हॉट्सअॅप स्टेटसला फोटो शेअर


या प्रकरणी ग्लोबल सायन्स रिसर्च लि. या आणखी एका कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. .या ग्लोबल सायन्स रिसर्च लि.ने अवैध मार्गाने 5.62 लाख भारतीय फेसबुकधारकांचा डेटा जमा केला आणि त्याचे हस्तांतर केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीला केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. केंब्रिज अॅनालिटिकाने त्यावेळी सांगितले होते की हा सर्व डेटा त्यांना ग्लोबल सायन्स रिसर्च लि. या संस्थेकडून मिळाला होता.


या डेटाचा वापर भारतातील निवडणुकीवर परिणाम करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोपही सीबीआयने आपल्या अहवालात केला आहे. मार्च 2018 मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया प्लॅटफॉर्मनी केब्रिज अॅनालिटिकाचे अधिकारी, कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या आधारे सांगितले होते की या फर्मने त्यांच्या मान्यतेशिवाय पाच कोटीपेक्षा जास्त फेसबुक यूजर्सची खासगी माहिती गोळा केली होती.


Apple vs FB | यूजर्सच्या गोपनीयतेच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा फेसबुक आणि अॅपल आमने-सामने


अमेरिकेच्या निवडणुकीवर परिणाम
केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीवर या आधीही आरोप ठेवण्यात आले आहेत. अमेरिकेत 2016 साली झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत व्हावी म्हणून केंब्रिज अॅनालिटिकाने जवळपास 8.7 कोटी फेसबुक खात्याची माहिती जमा केली होती असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.


डेटा लीक प्रकरणी फेसबुकवर 34 हजार कोटींचा दंड, टेक कंपनीवरील आजवरची सर्वात मोठी दंडात्मक कारवाई