पाटणा : बिहारच्या जहानाबादमध्ये भारत बंदमुळे झालेल्या भीषण वाहतूक कोंडीत अडकल्याने दोन वर्षांच्या एका आजारी मुलीचा मृत्यू झाला. मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जात असताना, ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने मुलीने रस्त्यातच प्राण सोडले.


विनंती करुनही आम्हाला जाऊ दिलं नाही
बंददरम्यान मुलीची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीय तिला घेऊन जहानाबादमधील सदर रुग्णालयात घेऊन जात होते. परंतु आंदोलकांनी रस्ता रोखल्याने त्यांची गाडी त्यात अडकली. मुलीचे वडील प्रमोद मांझी यांनी सांगितलं की, "माझ्या मुलीला डायरिया झाला होता आणि तिला डॉक्टरकडे घेऊन जाणं गरजेचं होतं. आम्ही तिला जहानाबादच्या सदर रुग्णालयात घेऊन जात होता. पण आंदोलकांनी अनेक ठिकाणी रिक्षा थांबवली. आम्हाला जाऊ द्या, अशी विनंती करत होतो. पण एकानेही ऐकलं नाही. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास आम्हाला उशिर झाला आणि तिचा मृत्यू झाला. जर त्यांनी आम्हाला जाऊ दिलं असतं, तर तिचा जीव वाचला असता."

तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाने मुलीच्या मृत्यूचं खापर कुटुंबीयांवरच फोडलं. मुलीचे कुटुंबीय तिला घेऊन घरातून उशिरा बाहेर पडले होते. त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा दावा जहानाबादचे उपविभागीय दंडाधिकारी परितोष कुमार यांनी केला आहे.


काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला बिहारमध्ये फार हिंसक वळण मिळालं. विरोधकांनी अनेक ठिकाणी चक्काजाम केला, रेल्वे रोखल्या. पाटणासह अनेक परिसरांमध्ये विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं.

मुलीच्या मृत्यूवर भाजपने काँग्रेसला घेरलं
मुलीच्या मृत्यूवरुन केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. "हिंसा आणि मृत्यूच्या खेळासाठी जबाबदार कोण आहे? औषधांचं दुकान आणि अॅम्ब्युलन्स रोखलं जात नाही. बिहारच्या जहानाबादमध्ये काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अॅम्ब्युलन्सला रस्ता दिला नाही. यामुळे त्या छोट्या मुलीचे प्राण गेले. यासाठी जबाबदार कोण आहे? हिंसेचा हा खेळ थांबायला हवा. देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जनतेची साथ मिळाली नाही तर हिंसेचं प्रदर्शन करुन बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही जनतेच्या अडचणींसोबत आहोत. यावर उपाय काढण्याच्या प्रयत्न करत आहोत आणि काढू," असं रवीशंकर प्रसाद म्हणाले.