तर दुसरीकडे कैलाश-मानसरोवर यात्रेहून परतलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी कैलाश-मानसरोवर यात्रेवरुन आणलेल्या पाण्याची बाटली खिशातून काढली आणि त्यातलं पाणी महात्मा गांधींच्या समाधीवर अर्पण केलं. यावेळची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
त्यामुळे राहुल गांधींनी एकाच वेळी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन लोकभावनेला हात घातला. तर दुसरीकडे कैलाश मानसरोवरहून आणलेलं पाणी वाहून धार्मिक भावनाही जिंकण्याचा प्रयत्न केला.
दर्शन घेतल्यानंतर राजघाटवरुन पदयात्रा करत रामलीला मैदानावर जाणार आहेत आणि तिथे धरणं आंदोलनाला सुरुवात होईल. विशेष म्हणजे आजच्या आंदोलनात सोनिया गांधी स्वत: उपस्थित राहणार आहेत.
भाजपचे राहुल गांधींच्या यात्रेवर सवाल
भाजपने राहुल गांधी कैलाश मानसरोवरच्या यात्रेवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र त्यानंतर राहुल गांधींनी कैलाश यात्रेचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. कायम पारंपरिक कुर्ता पायजम्यात दिसणारे राहुल गांधी या फोटो टीशर्ट, जॅकेट आणि स्पोर्ट्स लूकमध्ये दिसत होते.
भारत बंदमध्ये मनसे सहभागी
काँग्रेससह बंदमध्ये सहभागी असलेल्या पक्षांचे नेते आज सकाळी आठ वाजताच आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. शांततेच्या मार्गाने आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ न देता आंदोलन करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.
इंधनाचे दर गगनाला
2013 च्या तुलनेत कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही पेट्रोल 88 रुपयांवर तर डिझेल 77 रुपयांवर पोहोचलंय. त्यामुळे सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मात्र एक्साईज ड्यूटी किंवा इतर अधिभार कमी करुन जनतेला दिलासा देण्याची कुठलीही इच्छा मोदी सरकारची दिसत नाही.