भारत बंद नवी दिल्ली: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीविरोधात देशभरात आंदोलनं सुरु आहेत. मात्र केंद्र सरकारने इंधनाचे दर आमच्या हातात नसल्याचं स्पष्ट केलं. केंद्रीय कायदेमंत्री आणि भाजप नेते रवीशंकर प्रसाद  यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली.


रवीशंकर प्रसाद म्हणाले, “सध्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र ही अशी समस्या आहे, ज्याचं नियंत्रण आमच्या हातात नाही.

पेट्रोलचे दर कमी व्हायलाच हवेत. आम्ही त्यावर काहीतरी उपाय काढू. पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर आमचं नियंत्रण नाही. अनेक देशांनी उत्पादन मर्यादित केलं आहे. व्हेनेज्युएलामध्ये अस्थिरता आहे, अमेरिकेत गॅस उत्पादन अद्याप सुरु झालेलं नाही, तर अमेरिकेने इराणवर बंदी घातली आहे. त्यामुळे जगभरात इंधनाची मागणी आहे, त्या तुलनेत पुरवठा कमी आहे. आम्ही बचाव करत नाही तर आम्ही जनतेसोबत आहोत. आमच्या सरकारच्या काळात पेट्रोल दर कमीही झाले आहेत आणि वाढलेही आहेत. ही अशी समस्या आहे, ज्यावरचा उपाय आमच्या हातात नाही”

रवीशंकर प्रसाद यांनी विरोधकांचा भारत बंद अयशस्वी असल्याचं म्हटलं. लोकशाहीत सर्वांना विरोध करण्याचा अधिकारी आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. मात्र लोकशाहीत राजकारण हिंसेच्या मार्गाने करणार का? असा सवाल त्यांनी विचारला.

भारत बंदच्या नावाखाली पेट्रोल पंपांना आग लावली जात आहे, बस, गाड्यांची तोडफोड सुरु आहे. या हिंसेला जबाबदार कोण याचं उत्तर काँग्रेस देणार का? अशीही विचारणा रवीशंकर प्रसाद यांनी केली.