Bengaluru Heat : बंगळुरू तापलं, 41.8 अंश सेल्सियसने शहरात अंगाची लाहीलाही, कर्नाटकात उष्णतेची लाट
Heat Wave In Karnataka : कर्नाटकातील अनेत भागांमध्ये उष्णतेची लाट असून येत्या 5 मे पर्यंत ही लाट कायम असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
Heat Wave In Karnataka : बंगळुरूमधील केंगेरी येथे मंगळवारी सर्वाधिक म्हणजे 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कर्नाटक स्टेट नॅचरल डिझास्टर मॉनिटरिंग सेंटरने (KSNDMC) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी बंगळुरूमधील बिदारहल्लीमध्ये 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बंगळुरूमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
कर्नाटकात उष्णतेची लाट
भारतीय हवामान खात्याने कर्नाटकातील बिदर, कलबुर्गी, विजयपुरा, यादगीर, रायचूर, बागलकोट, बेलगाव, गदग, धारवाड, हावेरी, कोप्पल, विजयनगरा, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमाकुरू, कोलार, मंड्या, बल्लारी, हसननगर येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. बंगळुरू अर्बन, बंगळुरू ग्रामीण, रामनगरा, म्हैसूर, चिक्कमगालुरू आणि चिक्कबल्लापुरा जिल्ह्यामध्ये 5 मे पर्यंत ही उष्णतेची लाट कायम असणार आहे असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारी बंगळुरूमध्ये कमाल तापमान 38.2 अंश सेल्सिअस आणि HAL विमानतळावर 37.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कलबुर्गी येथे सर्वाधिक 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेची लाट
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेच्या लाटेची नोंद करण्यात आली आहे. सांताक्रुजमध्ये 38.4 अंश सेल्सिअस तर कुलाब्यात 34.1 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक भागातील तापमान 40 अंशांच्या पार
राज्यात उष्णतेची लाट कायम असून अनेक ठिकाणी तापमान हे 40 अंशाच्या वर गेल्याचं दिसून आलं. विदर्भासोबतच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही तुरळक भागात तापमान 44 अंशापर्यंत गेल्याची नोंद आहे. तर कोकणात सलग तिसऱ्या दिवशी उष्णतेच्या लाटेची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरीतही तापमान 35.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.
राज्यातील थंड हवेची ठिकाणं असलेले महाबळेश्वर आणि माथेरान देखील तापलं असून महाबळेश्वर 35.1 अंश सेल्सिअस तर माथेरानमध्ये 37 अंश सेल्सिअस तापमान आहे. तर जेऊरमध्ये आज राज्यात सर्वोच्च तापमान, 44.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे. अकोल्यातही तापमान 43.9 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.
देशभरात उकाडा, अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा
राज्यासह देशात्या अनेक भागात उष्णता वाढणार असल्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाल्याचं चित्र आहे. देशात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसह दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ आदी राज्यांतही तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यातही पारा चढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भातील 10 जिल्ह्यामध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेलं आहे.
ही बातमी वाचा: