Bengaluru Yellow Alert : बंगळुरू : एकीकडे लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा आणि दुसरीकडे अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) थैमान घातलं आहे. उत्तर भारतात मे महिन्याच्या कडाकाच्या उन्हानं काहिली होत आहे. पण दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD) गुरुवारी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये (Bengaluru) वादळ आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, 16 मेपासून बंगळुरूसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 


बंगळुरूमध्ये हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा देत बंगळुरूसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असल्यानं लोकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्यानं 16 मेपासून बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 


देशभरात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. अशातच बंगळुरूसाठी आज भारतीय हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळाचा अंदाज वर्तवला आहे. बंगळुरू शहरात 270 हून अधिक झाडं कोसळली आहेत. 


16 ते 21 मेपर्यंत यलो अलर्ट 


16 मे ते 21 मे पर्यंत बंगळुरूमधील हवामान खूप ढगाळ असेल. तसेच, सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याचीही शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. आठवडाभर शहरात मुसळधारेचा अंदाज आहे. 16, 17 आणि 19 मे रोजी वातावरण ढगाळ असू शकतं तसेच, अधूनमधून ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.  


मुंबईतील परिस्थिती काय? 


तीन दिवसांपूर्वी मुंबईत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला होता. या पावसानंतर मुंबईत तात्पुरता गारवा जाणवत होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील उकाडा प्रचंड वाढला आहे. गुरूवारीही ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस अंगाची काहीली होणार, हे नक्की. 


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 19 मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर 31 मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यापुढील वातावरण पोषक असेल तर मान्सून 7 ते 10 जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. 


जागतिक स्तरावरही तापमानात वाढ 


जागतिक हवामान संघटनेच्या माहितीनुसार, गेल्या तीन दशकांमध्ये जगभरात उष्माघातामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू हे भारतात झाले आहेत. कोरड्या हवामानात आणि कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या  भागात सर्वाधिक मृत्यूदर असल्याचे निरीक्षण 'कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस' आणि नोआच्या मासिक अहवालात नोंदवण्यात आले आहे.