चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानं तामिळनाडू राज्यच शोकसागरात बुडालं आहे. त्या पार्श्वभूमीवर चेन्नईतील आगामी कसोटी सामन्याविषयी कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी स्पष्ट केलं आहे.


भारत आणि इंग्लंड संघांमधल्या मालिकेची पाचवी आणि अखेरची कसोटी 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाणार होती. मात्र आता या सामन्याच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, बीसीसीआय तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनशी चर्चा करत असल्याचं शिर्के यांनी सांगितलं.

निर्णय घेण्यासाठी कोणतीही डेडलाईन ठरवण्यात आलेली नाही, मात्र स्थानिक क्रिकेट असोसिएशनशी सातत्याने आपण संपर्कात असल्याचंही शिर्केंनी सांगितलं. दरम्यान, तामिळनाडूच्या डिंडिगुलमध्ये होणारा ओडिशा आणि झारखंड संघांमधला रणजी सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं सोमवार, 5 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजता निधन झालं. त्यानंतर तामिळनाडूमध्ये सात दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला 2-0 अशी आघाडी मिळाली आहे. टीम इंडियाने विशाखापट्टणम आणि मोहालीतील कसोटी खिशात घातली आहे.