मुंबई : तुमच्या बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू चोरीला गेल्यास बँक जबाबदार नसेल. माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.


लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तू किंवा दागिने चोरीला गेल्यास नुकसान भरपाईबद्दल कोणतेही निर्देश बँकांना जारी करण्यात आलेले नाहीत, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचाही समावेश आहे.

लॉकर भाडेतत्त्वावर घेताना बँकेच्या ग्राहकांशी केल्या जाणाऱ्या करारात यासंदर्भात कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे युद्ध, आंदोलन, चोरी किंवा दरोडा अशा कुठल्याही परिस्थितीत बँकेतल्या लॉकरमधून कोणतीही वस्तू गहाळ झाली, तरी त्याला संपूर्णपणे संबंधित खातेदारच जबाबदार राहील, असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि 19 सरकारी बँकांना माहिती कायद्याच्या अंतर्गत एका वकिलाने हा प्रश्न विचारला होता. बँक खातेदाराची वस्तू गहाळ झाल्यास त्याची चौकशी करण्याबाबतही कोणत्याच सूचना नसल्याचं बँकांनी सांगितलं आहे.

बँक ऑफ इंडिया, ओबीसी, पीएनबी, युको आणि कॅनरा बँकांसह अन्य काही बँकांनी याबाबत उत्तर दिलं आहे. लॉकरच्या बाबतीत बँक आणि ग्राहकांचं नातं हे घरमालक आणि भाडेकरुंसारखं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लॉकरमधील सामानासाठी ग्राहकच जबाबदार असतो. ग्राहकांची इच्छा असल्यास त्यांनी आपल्या वस्तूंचा विमा उतरवावा, असा सल्लाही लॉकर भाडेतत्त्वावर देताना करारात दिला जातो.