मुंबई : आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा केला जात आहे.लखनऊ आणि अलाहाबादमध्ये काल ईदचा चांद दिसला. त्यानंतर मरकजी चांद कमेटीचे अध्यक्ष मौलाना खालिद रशीद फिरंगी यांनी याबाबतची माहिती दिली.
ईदच्या सणाबरोबरच एका महिन्यापासून सुरु असणारा रमजानचा पवित्र महिन्याचाही काल शेवटचा दिवस होता. भारतात आज ईद साजरी केली जाणार असली तरी कतार, संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये कालच ईद साजरी केली गेली.
ईदनिमित्त हजारो मुस्लिम बांधव मशिदीत जाऊन नमाज पठण करत आहेत. मुंबईतल्या माहिम दर्गावर नमाज पठण करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव जमले होते. नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
काल पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रामातून देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही आज ट्वीट करुन देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
वास्तविक, हिजरी कॅलेंडरनुसार, संपूर्ण वर्षभरात दोनवेळा ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यातील पहिल्या ईदला ईद-उल-फितर म्हटलं जातं. तर दुसऱ्या ईदला ईद-उल जुहा असं म्हणलं जातं.
आज संपूर्ण देशभरात ईद-उल फितर साजरी केली जात असून, यानिमित्त मुस्लिम बांधव मिठाई वाटून ईद मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत. यानिमित्त अनेक मशिदींना विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.