वॉशिंग्टन : भारत एक व्यवसायासाठी अनुकूल देश म्हणून समोर येत आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूक करुन भारताच्या विकासात योगदान द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील टॉप 21 कंपन्यांच्या सीईओंना केलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जगभरातल्या 21 दिग्गज कंपन्यांच्या सीईओंची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी उद्या मोदींची भेट होणार आहे. मात्र त्याआधी टॉप 21 कंपन्यांच्या सीईओंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक पार वॉश्गिंटनमध्ये पार पडली.

या बैठकीत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, अॅपलचे सीईओ टीम कूक, अॅमेझॉनचे जेब बिसोज यांचा समावेश होता.

‘मेक इन इंडिया’ मोहीम, ट्रम्प यांचे फर्स्ट अमेरिका धोरण, या आणि इतर मुद्द्यांवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा केली. त्यामुळे या चर्चेतून नेमकं काय बाहेर येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

भारताने गेल्या तीन वर्षात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आणली आहे, याकडेही मोदींनी लक्ष वेधलं. मोदी सरकारने आतापर्यंत केलेलं काम आणि भविष्यातील धोरणांविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीत मोदींशी अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यांनी गुंतवणुकीच्या विविध कल्पना सुचवल्या. शिवाय सर्व कंपन्यांचे प्रतिनिधीही भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत, असं सुंदर पिचाई यांनी बैठकीनंतर सांगितलं.