30 मार्चला मल्याच्या वकिलांनी कोर्टात अर्ज करून 4 हजार कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र बँकांना मल्ल्याकडून अधिक चांगला प्रस्ताव अपेक्षित आहे असं आज कोर्टात सांगण्यात आलं.
येत्या दहा दिवसात मल्ल्यानं आपल्याकडील एकूण संपत्तीचा आकडा कोर्टापुढे जाहीर करुन मोठी रक्कम जमा करावी. त्यानंतरच बँकांशी चर्चा होऊ शकेल असे आदेश कोर्टानं मल्ल्याच्या वकिलांना दिले आहेत.
'किंगफिशर एअरलाईन्स'चा मालक असलेल्या विजय मल्ल्यावर 17 बँकांचं नऊ हजार कोटींचं कर्ज आहे. आर्थिक अफरातफरीप्रकरणी ईडीकडून मल्ल्याची चौकशी सुरू असून अटक होण्याच्या भीतीनं तो देशातून पळून गेला आहे.
नेमका आकडा किती?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्ल्या यांनी दिलेल्या कर्जफेडीच्या प्रस्तावात एकूण 6903 कोटी रूपयाचं कर्ज असल्याचं मान्य केलंय, त्यापैकी चार हजार कोटी रूपये ते सप्टेंबर पर्यंत देण्यास तयार आहेत. मात्र बँकाच्या मते ही रक्कम तब्बल नऊ हजार कोटी रूपये आहे. विजय मल्ल्या यांच्या प्रस्तावानुसार ते फक्त मुद्दल गृहित धरत आहेत. आता त्यावरील थकीत आणि नियमित व्याज मिळून ही रक्कम तब्बल नऊ हजार कोटींपर्यंत जातेय.
मल्ल्या देश सोडून पळाला
17 बँकांकडून 9 हजार कोटींहून अधिक कर्ज घेतलेले उद्योगपती विजय मल्ल्यांनी देश सोडला असल्याची माहिती 9 मार्चला सरकारने कोर्टात दिली. अटॉर्नी जनरल मुकूल रहोतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. यावेळी लंडनमधील भारतीय दूतावासतर्फे विजय मल्ल्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.
स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या समूहाने मल्ल्या आणि किंगफिशर यांना कर्ज पुरवठा केलेल्या सात हजार 800 कोटी रूपयांमध्ये जवळपास 1600 कोटी रूपये एकट्या स्टेट बँकेने दिले आहेत. जानेवारी 2012 पासून मल्ल्या यांच्या किंगफिशरने कर्जांचे हफ्ते थांबवले आहेत.
किंगफिशरला कर्ज पुरवठा करणाऱ्या 17 बँकामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, यूको बँक आणि देना बँकेचा समावेश आहे.
जेट एअरवेजच्या फ्लाईटने लंडनला रवाना
विजय मल्ल्या 2 मार्चला जेट एअरवेजच्या ‘9W 122’ या दुपारी दीड वाजताच्या फ्लाईटने दिल्लीहून लंडनला रवाना झाले. एअरपोर्टवर चेक इनवेळी मल्ल्या यांच्याकडे 7 बॅग होत्या, अशी माहिती मिळते आहे.