नवी दिल्ली: आयआयटीमधून इंजिनिअर होणं आता बरंच महागणार आहे. त्यासाठी आता लाखो रुपये मोजावे लागणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आयआयटीची ट्यूशन फी 90 हजारांहून थेट 2 लाख करण्यात आली आहे. म्हणजेच चार वर्षासाठी आता थेट 8 लाख रुपये मोजावे लागणार आहे.
90 हजार याप्रमाणे आधी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी 3 लाख 60 हजार मोजावे लागत होते. मात्र आता अधिक 4 लाख 40 हजार मोजावे लागणार आहेत. तसेच यामध्ये इतर फीचा समावेश करण्यात आलेला नाही.
मात्र, एससी, एसटी आणि दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी (ज्यांचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा कमी आहे) खुशखबर आहे. या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात आली आहे. तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात आली आहे.
याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी आहे त्यांची फी दोन तृतीयांश माफ करण्यात आली आहे. तसेच एक तृतीयांश फीसाठी सरकारनं कर्जाचीही तरतूद केली आहे.
आयआयटी काउंसिलनं फी वाढीचा हा निर्णय घेतला असून या कांउसिलच्या प्रमुख केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या आहेत.
काय आहे आयआयटी कॉलेज?
देशातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी असणारी शासकीय अग्रगणी संस्था आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आयआयटीमधून शिक्षण घेण्याचं स्वप्न असतं. दिल्ली, मुंबई, खडगपूर यासह देशात आयआयटी एकूण 17 ठिकाणी आहे.
देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील आयआयटीचे विद्यार्थी होते.