आरबीआयने नुकत्याच सादर केलेल्या पतधोरणात रेपो रेटमध्ये कुठलाही बदल केला नाही. आरबीआयच्या या निर्णयाचं अर्थमंत्री अरुण जेटलींनीही समर्थन केलं. नोटाबंदीनंतर सादर केलेल्या सलग दुसऱ्या पतधोरणात आरबीआयकडून रेपो रेट कायम ठेवण्यात आलं.
बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात, त्यावर रिझर्व्ह बँक जो व्याजदर आकारते, त्याला रेपो रेट म्हणतात.
रेपो रेट न वाढल्याने आणि बँकांमध्ये नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या रकमेचा बँकांना फायदा होईल. पण त्या तुलनेत बँकांनी केलेल्या व्याजदरातील कपात सरासरीने कमी आहे. त्यामुळे बँकांनी व्याजदरात आणखी कपात करावी, असं उर्जित पटेल यांनी म्हटलं आहे.
बँकांकडून व्याजदरात 90 बेसिस पॉईंटने कपात
जानेवारी 2015 ते सप्टेंबर 2016 या काळात आरबीआयने रेपो रेटमध्ये जवळपास पावणे दोन टक्क्यांनी कपात केली. तर बँकांनीही व्याजदारात 60 ते 70 बेसिस पॉईंटने (100 बेसिस पॉईंट म्हणजे एक टक्का) कपात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबरला देशाला संबोधित केलेल्या भाषणात बँकांनी व्याजदर कमी करावेत, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर विविध बँकांनी जवळपास 90 बेसिस पॉईंटने व्याजदरात कपात केली. त्यामुळे रेपो रेटच्या तुलनेत व्याजदरातील ही कपात योग्य आहे, असा दावा बँकांनी केला आहे. मात्र आरबीआयचं मत याबाबत वेगळं आहे.
रेपो दराचा तुमच्यावर काय परिणाम?
बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, त्यावर रिझर्व्ह बँक जो व्याजदर आकारते, त्याला रेपो रेट म्हणतात. जर रेपो रेट कमी झाला, तर बँकांना रिझर्व्ह बँकेला कमी व्याज द्यावं लागेल. त्यामुळे जर बँकांना फायदा झाला, तर बँका ग्राहकांनाही व्याजदर कपात करुन फायदा मिळवून देते.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो
नोटाबंदीनंतर किती जुन्या नोटा जमा?
नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जुन्या पाचशे, हजारच्या जमा झालेल्या नोटांची मोजणी अजून चालू आहे, असं उर्जित पटेल यांनी सांगितलं. मोजणी पूर्ण झाल्यानंतर आकडेवारी जारी करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
10 डिसेंबर 2016 पर्यंत बँकांमध्ये 12.44 लाख कोटी रुपये जुन्या नोटांमध्ये जमा झाले आहेत, अशी माहिती आरबीआयने यापूर्वी दिली होती. नोटाबंदीनंतर 15.44 लाख कोटी रुपयांच्या पाचशे, हजारच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार झाल्या आहेत.
संबंधित बातम्या: