ढाका : बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहे. या हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बांगलादेशमधील पोलिसांकडून प्रयत्न केले जात असून शनिवारी पोलिसांनी राजधानी ढाका येथे अनेक ठिकाणी गस्त घातली. सध्याच्या स्थितीत बांगलादेशमध्ये अनेक ठिकाणी कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून तेथील सरकारने उपद्रवी लोकांना दिसताक्षणी गोळ्या घाला, असे निर्देश दिले आहेत.
संचारबंदी आणि दिसताक्षणी गोळी घालाचा आदेश
सत्ताधारी आवामी लीग पार्टीचे महासचिव आणि खासदार ओबैदुल कादर यांनी बांगलादेशमधील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. सध्या लागू करण्यात आलेली संचारबंदी ही रात्री चालू होईल आणि दुपारी 12 वाजेपर्यंत ती कायम असेल. दुपारी 12 ते रात्रीचे 2 वाजेपर्यंत संचारबंदी पुन्हा चालू होईल. संचारबंदी बंद झाल्यानंतर नागरिक त्यांची रोजची कामे करू शकतात. या काळात एखादी व्यक्ती उपद्रव करताना दिसल्यास दिसताक्षणी गोळी घालण्याचा आदेश देण्यात आला आहे.
कार्यालये, आस्थापना बंद
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार शनिवारी पोलीस तसेच लष्कराने राजधानी ढाका येथे वेगवेगळ्या भागात गस्त घातली. सरकारने येथे सर्व कार्यालये आणि आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. आरक्षणाच्या मागणीला घेऊन उभ्या राहिलेल्या आंदोलनात गेल्या एका आठवड्यात साधारण 114 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यात शेकडो लोक जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत.
आंदोलनाचे नेमके कारण काय?
शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते.
हेही वाचा :
इमर्जन्सी फंड उभा करायचाय, पण कसा करू समजत नाहीये? सोप्या भाषेत समजून घ्या 67:33 सूत्राची जादू!