मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरातील कराची बेकरीच्या नावाला आक्षेप घेत त्याचे नाव बदलावे अशी मागणी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर स्थानिक मनसे नेत्याने बेकरीच्या मालकाला कायदेशीर नोटीस पाठवली होती. आता त्या नोटीशीला बेकरी मालकाने उत्तर दिलं आहे.


बेकरीचे संस्थापक हे फाळणीच्या घटनेचे बळी झाले होते. या नावामुळे भारतीयांच्या भावना दुखावणार नाहीत अशा प्रकारचे उत्तर बेकरीच्या मालकाने दिले आहे.


बेकरीच्या मालकाने या नोटीशीला दिलेल्या आपल्या उत्तरात म्हटलं आहे की, "या बेकरीची स्थापना पाकिस्तानातून विस्थापित होऊन भारतात आलेल्या एका सिंधी-हिंदू परिवाराने केली होती. या ब्रॅंडला आता जगभरात ओळखलं जातं आहे. भारतीयांच्या भावना दुखावण्यासाठी कराची या नावाचा वापर केला गेला नाही. या बेकरीचे संस्थापक खानचंद रमानी हे फाळणीदरम्यान पाकिस्तानच्या समर्थकांकडून करण्यात आलेल्या हिंसेचे बळी ठरले होते ही खरी परिस्थिती आहे."


स्थानिक मनसे नेते हाजी सैफ शेख यांनी कराची बेकरीच्या मालकांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्यात असं म्हटलं होतं की, बेकरीच्या नावातील 'कराची' हा शब्द भारतीयांची भावना दुखावणारा आहे. शेख यांनी या बेकरीचे नाव बदलण्यात यावं आणि त्याचे साईन बोर्डही मराठीत असावं अशी मागणी केली होती.


बेकरीच्या मालकाने दिलेल्या उत्तरात असंही सांगण्यात आलं आहे की, "पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हिंसेचे बळी ठरल्याने त्यांच्याकडून भारतीयांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य करण्यात येणार नाही. बेकरीच्या संस्थापकांनी कराची हे नाव देऊन भारतीय सैन्यांप्रती असन्मान दर्शवला आहे असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे बेकरी संस्थापकांच्या भारत निष्ठेवर जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत ते चुकीचे आहेत."


मुंबईतील एका बेकरीचे नाव 'कराची स्वीट्स' असल्याच्या कारणावरुन शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकरांनी आक्षेप घेत बेकरीच्या मालकाला नाव बदलण्यास सांगितले होते. त्यानंतर शिवसेना पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.


महत्वाच्या बातम्या: