मुंबई : मुंबईत कराची नावाने सुरू असणाऱ्या उद्योगांबद्दल शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे. बांद्रा इथल्या 'कराची स्वीट्स' या दुकानावर शिवसेनेच्या वतीने आक्षेप घेतलाय तर याच परिसरातील 'कराची बेकरी' या नावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेत आज आंदोलनही केलं. कराची नावाने सेना आणि मनसे या दोघांमध्ये आता श्रेय वादाचं राजकारण पेटले आहे. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने 2010 झाली शिवसेनेने 'बंगलोर बेकरी'च्या विरोधात केलेल्या आंदोलनाची आठवण होते.


1 नोव्हेंबर 2010 साली बेळगाव शहरांमध्ये कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा करण्यात आला होता. यावेळी मराठी भाषिकांनी नेहमीप्रमाणे काळे झेंडे लावून काळा दिन साजरा केला होता. दुपारनंतर अचानक बेळगाव शेजारी असणाऱ्या गावांमध्ये कर्नाटक पोलिसांनी घुसखोरी करून त्या परिसरातील मराठी भाषिकांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली होती. महाराष्ट्रामध्ये बंगलोर बेकरी नावाने अनेक बेकरी व्यवसाय जोमात चालू होते. कर्नाटकची राजधानी असणाऱ्या बंगलोर या नावाला विरोध दर्शवत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी असणाऱ्या बंगलोर बेकरीवर हल्ला चढवला होता. बेकरी समोर असणाऱ्या बंगलोर हे नाव हटवण्याची मागणी शिवसैनिकांनी केली होती. कोल्हापुरातही असेच मोठे आंदोलन झालं होतं. या आंदोलनानंतर त्वरित बंगलोर बेकरीचं अय्यंगार बेकरीमध्ये रूपांतरही झालं होतं.


मुंबईतील 'कराची स्वीट्स'चं नाव बदला; शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची मागणी


कर्नाटक राज्य सरकारने बेळगाव परिसरात असणाऱ्या मराठी पाट्यांवर आक्षेप घेतला होता आणि संपूर्ण कारभार हा कन्नड भाषेत करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाणही केली होती. याचे पडसाद संपूर्ण सीमाभागात पडले होते. त्यामुळे कोल्हापूरपासून कर्नाटक पाट्या हटाव, कर्नाटक राज्यातील नाव हटाव हे आंदोलन त्यावेळी झालं होतं. त्यातूनच बंगलोर बेकरीचे नाव बदलून अय्यंगार बेकरी झालं होतं. हे त्यावेळच्या आंदोलनाचं यश होतं.


कराची स्वीटचं नाव बदला, शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची दुकान मालकाकडे मागणी