मुंबई : मुंबईतील कराची बेकरीच्या नावाला शिवसेनेच्या नितीन नांदगावकरांनी आक्षेप घेतला आहे. वांद्रे येथील कराची बेकरीचं नाव बदला, अशी मागणी नांदगावकरांनी केली आहे. नांदगावकर यांच्या मागणीला शिवसेनेचं समर्थन आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. कराची हे नाव पाकिस्तानमधील आहे आणि या नावामुळे आपल्या सैनिकांचा अपमान होतोय, असं सांगत कराची बेकरीचं नाव बदलण्याची मागणी नितीन नांदगावकरांनी केली आहे.
कराची स्वीट्स ही संपूर्ण देशात पसरलेली फूड चैन आहे. साधरणतः प्रमुख शहरं आणि महानगरांमध्ये कराची स्वीट्सचे प्रोडक्ट्स विकणारे अनेक आउटलेट्स आहेत. मुंबईतही अनेक ठिकाणी कराची बेकरीचे आउटलेट्स आहेत. या बेकरीच्या नावातील 'कराची' या शब्दाला आक्षेप घेत शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांनी विरोध केला आहे. तसेच मुंबईतील कराची बेकरीच्या सर्वच आउटलेट्सला त्यांनी इशारा दिला आहे. त्यांनी नाव रद्द करा किंवा त्यातील कराची हा शब्द काढून टाका, अशी मागणीही केली आहे.
नितीन नांदगावकर म्हणाले की, 'मुंबई आणि महाराष्ट्रात कराची नावाने कोणतेही व्यवसाय चालणार नाहीत. यामुळे पाकिस्तानला तुम्ही एकप्रकारे पाठिंबा देत असल्याचं निदर्शनास येतं. महाराष्ट्रात राहायचं असेल, तर असं नाव चालणार नाही.' यासंदर्भात नितीन नांदगावकर काही बेकरीच्या मालकांशी बोललेले असून सुरुवातीला त्यांनी विनंती केली आहे. तसेच काही बेकरीच्या मालकांनी नितीन नांदगावकरांच्या या मागणीला मान्यता देत आम्ही हे नाव काढू असंही सांगितलं आहे. या मालकांनी आणि नितीन नांदगावकर यांनी आणि या सेंटर्सच्या मालकांनी दिल्ली आणि हैदराबाद येथील सेंटर्सवर पत्रव्यवहार केला आहे.
पाहा व्हिडीओ : कराची स्वीटचं नाव बदला, शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची दुकान मालकाकडे मागणी
दरम्यान, 2010मध्ये शिवसेनेनं अशाच पद्धतीनं बँगलोर बेकरीच्या नावाला आक्षेप घेतला होता. त्यानंतर अय्यंगार बेकरी या नावाने या बेकरीचे आउटलेट्स मुंबईत सुरु करण्यात आले. तसाच मुद्दा नितीन नांदगावकर यांनी उचलला असून त्यांनी तुमच्या कुटुंबियांचं नाव द्या. पण पाकिस्तानातील शहराचं नको, असं म्हटलं आहे.
मनसेचाही 'कराची' या नावाला आक्षेप
मनसे पदाधिकारी यांनी आज मुंबईतील कराची बेकरीमध्ये समोर जाऊन आंदोलन केले. कराची नावाला मनसेचा विरोध असून हे नाव बदलावे ही मागणी मनसे कडून केली जात आहे. यासाठी मनसेने कराची बेकरीमध्ये जाऊन निवेदन देऊन हे नाव बदलण्यास संगितले आणि यावेळी कराची बेकरीमधील पॅकेट्स बाहेर टाकून निषेध व्यक्त करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या :