मुंबई : मुंबईत कराची नावाने सुरू असणाऱ्या उद्योगांबद्दल शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे. वांद्रे इथल्या 'कराची स्वीट्स' या दुकानावर शिवसेनेच्या वतीने आक्षेप घेतलाय तर याच परिसरातील 'कराची बेकरी' या नावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेत आज आंदोलनही केलं. परंतु ही मागणी निरर्थक असून ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत या संदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. संजय राऊत म्हणाले, "कराची बेकरी आणि कराची स्वीट्स 60 वर्षांपासून मुंबईसह देशात आहेत.त्यांचा पाकिस्तानशी संबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला व्यवसाय आहे. कराची बेकरीचं नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही."
कराची नावाने सेना आणि मनसे या दोघांमध्ये आता श्रेय वादाचं राजकारण पेटले आहे. कराची नावावर आक्षेप घेत एका बाजूला मनसे आक्रमक झाली आहे. तर दुसर्या बाजूला शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी बांद्रा इथल्या कराची स्वीट्स या दुकानात जाऊन दुकान चालकाला शिवसेनेच्या स्टाईल समज दिलेली आहे. जर हे नाव बदललं नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. महाराष्ट्रात राहून मराठीचा द्वेष करणाऱ्या आणि पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना शिवसेनेने इशारा दिला होता. यामुळे कराची बेकरीचं नाव बदलण्याच्या मुद्यावरून आता शिवसेनेतच मतभिन्नता असल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू आहे बांद्रा इथल्या कराची बेकरी च्या समोर... 'कराची स्विट्स' आणि कराची बेकरी नावाने मिठाईचे दुकान चालवणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका दिला आहे. या आस्थापनांच्या मालकांना मनसे थेट कोर्टात खेचलं आहे. पाकिस्तानची राजधानी असलेल्या कराची शहराच्या नावाने मुंबईत दुकान चालवण्यास मनसेने आक्षेप घेतला आहे. पारंपारिक शत्रू देशाची राजधानी 'कराची' या नावाचा आधार घेत मुंबईत 'कराची स्विट्स' नावाची दुकानं सुरू करुन भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेच पोहोचवून व्यवसाय केला जात आहे. तसेच मराठी भाषेचा द्वेष केला जात आहे. असा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आलेला आहे. आज कार्यकर्त्यांनी 'कराची स्वीट' आणि 'कराची बेकरी' व्यवस्थापनाला ही नावं ताबडतोब बदलण्याचा इशारा दिलेला आलेला आहे. जर पुन्हा या पाट्या अशाच राहिल्या तर मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर कराची बेकरी च्या व्यवस्थापनाने त्यांचे मुख्य केंद्र असणाऱ्या हैदराबाद इथल्या कार्यालयाशी संपर्क साधलेला आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील हैदराबाद घेतल्या व्यवस्थापनाला पत्र पाठवून त्यांना कोर्टात ही खेचले आहे. या संपूर्ण प्रकाराबद्दल हैदराबाद इथल्या व्यवस्थापनाशी बोलून हे नाव लवकर बदलणार असल्याचं सांगण्यात आले आहे.