एक्स्प्लोर
माजी मंत्र्याविरोधात कथित बलात्काराच्या प्रकरणातील 'ती' युवती बेपत्ता
माजी शिक्षणमंत्री आतानासियो उर्फ बाबूश मोन्सेरात यांच्यावर 2016 साली त्यांच्या आस्थापनात काम करणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप होता

पणजी : माजी मंत्री आणि पणजीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांच्याविरोधात दाखल कथित बलात्कार प्रकरणातील पीडित युवती अचानक बेपत्ता झाली आहे. दक्षिण गोव्यातील एका कॉन्व्हेंट हॉस्टेलमधून तक्रारदार युवती गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. महिला आणि बालकल्याण विभागाने याची गंभीर दखल घेत या प्रकरणात तपास करणाऱ्या वेर्णा पोलिसांकडून स्थिती अहवाल मागितला आहे. सध्या वेर्णा पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे. या घटनेमुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे 28 एप्रिलपासून ती युवती गायब झाली आहे. सदर कॉन्व्हेंटच्या नन्सनी याबाबत पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यात त्या युवतीला कुणीतरी भुलवून गायब केलं असावं, असा संशय व्यक्त केला आहे. माजी शिक्षणमंत्री आतानासियो उर्फ बाबूश मोन्सेरात यांच्यावर 2016 साली त्यांच्या आस्थापनात काम करणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्या युवतीला गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध करुन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात गोवा पोलिसांच्या महिला विभागाने मोन्सेरात यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केलं होतं. मागच्या आठवड्यात या प्रकरणात आरोप निश्चितीपूर्वीची सुनावणी झाल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणातील पीडित युवतीच गायब झाल्याने या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. कथित बलात्काराच्या प्रकरणानंतर त्या युवतीला अपना घरमध्ये ठेवण्यात आलं होतं. अपना घरमधून तिला शिक्षणासाठी दक्षिण गोव्यातील एका कॉन्व्हेंट हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत असे. 27 एप्रिल रोजी सकाळी ती हॉस्टेलमधून अचानक गायब झाली होती. मात्र रात्री नऊ वाजताच्या सुमारास पुन्हा हॉस्टेलमध्ये परतली होती. 28 एप्रिल रोजी कॉन्व्हेंटमधील सगळ्या नन्स रविवारच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेल्या असता ती युवती आपलं सामान भरुन परत अपना घरमध्ये जात असल्याचं सांगून कॉन्व्हेंटमधून बाहेर पडली होती. मात्र नंतर चौकशी केली असता ती अपना घरमध्ये गेलीच नसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर कॉन्व्हेंटमधून ती युवती बेपत्ता झाल्याची माहिती पोलिस स्थानकात देण्यात आली होती. मात्र यासंदर्भात रितसर तक्रार देण्यात आली नव्हती. सुमारे आठ दिवस उलटूनही ती परत न आल्याने शेवटी तक्रार नोंदवण्यात आली. ज्या दिवशी या मुलीने हॉस्टेल सोडले त्याच्या आदल्या दिवशी एका इंग्रजी वृत्तपत्रात बाबुश बलात्कार प्रकरणासंदर्भात वृत्त आले होते, कदाचित हे वृत्त वाचून दबावाखाली येऊन तिने पलायन केले, की कुणीतरी तिच्यावर दडपण आणून तिचे अपहरण केले, याची सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचं बायलांचो एकवोट या संघटनेच्या आवदा व्हिएगश यांनी सांगितलं. या प्रकरणात बाल कल्याण समितीनेही लक्ष घातले असून या समितीच्या सदस्यांनी वेर्णा पोलिसांशी संपर्क साधून तपास कुठे पोहचला आहे याची चौकशी केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























