Sharad Pawar on Babri Masjid: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी (8 ऑगस्ट) एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी बाबरी मशिद विध्वंसासंदर्बात एक मोठं वक्तव्य केलं आहे. रामजन्मभूमी आंदोलनाला वेग आला असताना, बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, या भाजपच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका, असा सल्ला त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना दिला होता, असा खुलासा शरद पवार यांनी केला. शरद पवार म्हणाले की, तत्कालीन भाजप नेत्या विजया राजे सिंधिया यांनी तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. नरसिंह राव यांनी त्यांच्या मंत्र्यांच्या सल्ल्याविरुद्ध त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता. दरम्यान, नरसिंह राव सरकारमध्ये शरद पवार संरक्षण मंत्री होते.


ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या 'हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसायड' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी पार पडला. प्रकाशन सोहळ्यावेळी बाबरी मशीद विध्वंसाच्या वेळी संरक्षणमंत्री असलेले शरद पवार कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, त्या बैठकीला मी तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि गृहसचिव माधव गोडबोले यांच्यासह उपस्थित होतो. त्या बैठकीत विजया राजे सिंधिया यांनी बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, असं आश्वासन तत्कालीन पंतप्रधान राव यांना दिलं होते, असा दावा पवार यांनी केला. शरद पवार म्हणाले की, गृहमंत्री आणि गृहसचिव यांना वाटलं की, काहीही होऊ शकतं, परंतु नरसिंह राव यांनी सिंधियावर विश्वास ठेवणं पसंत केलं.


शरद पवारांनी त्यावेळच्या घटनेचं वर्णन करताना सांगितलं की, "मंत्र्यांचा एक गट होता, मी त्या गटाचा सदस्य होतो. या बैठकीत विजया राजे सिंधिया म्हणाल्या होत्या की, बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, विजया राजे म्हणाल्या होत्या की, त्या आवश्यक ती सर्व पावलं उचलतील आणि पण यासंदर्भात पंतप्रधानांनी कठोर पावलं उचलू नयेत."


पंतप्रधान नरसिंह राव यांना भाजप नेतृत्वाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, असा सल्ला दिलेला : शरद पवार


त्यावेळी विजया राजे यांची सूचना पंतप्रधान नरसिंह राव यांनी मान्य केल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, त्यानंतर गृहमंत्री, गृहसचिव आणि खुद्द शरद पवार यांनी पंतप्रधान नरसिंह राव यांना भाजप नेतृत्वाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, काहीही शक्य आहे, असा सल्ला दिला असल्याचंही यावेळी पवारांनी सांगितलं. शरद पवार म्हणाले की, पंतप्रधानांनी भाजप नेत्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं पसंत केलं आणि त्यानंतर काय झालं ते आपल्या सर्वांना माहित आहेच.


बाबरी विध्वंसाच्या वेळी काय करत होते तत्कालीन पंतप्रधान?


कार्यक्रमादरम्यान, पत्रकार नीरजा चौधरी यांनी मशीद पाडल्यानंतर काही ज्येष्ठ पत्रकारांशी राव यांच्या संभाषणाची आठवण करून दिली, त्यावेळी पंतप्रधान राव यांना विचारलं होतं की, ते बाबरी विध्वंसाच्या वेळी काय करत होते.


नीरजा चौधरी यांनी असा दावा केला की, राव यांनी पत्रकारांना सांगितलं की, त्यांनी असं होऊ दिलं कारण यामुळे एक मोठी जखम भरून जाईल आणि भाजप राजकीय मुद्दा गमावेल, असं त्यांना वाटत होतं. दरम्यान, पुस्तक प्रकाशनाला शरद पवार, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, काँग्रेस नेते शशी थरूर, माजी रेल्वे मंत्री आणि भाजप नेते दिनेश त्रिवेदी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केलं. तर दिनेश त्रिवेदी यांनी राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळातील आणि त्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी अरुण नेहरूंच्या भूमिकेची आठवण करून दिली. त्रिवेदी म्हणाले, "अरुण नेहरू हे कुटुंबासारखे होते... त्यांचा काळ सर्वोत्कृष्ट काळांपैकी एक होता आणि हे असंच चालू राहिलं असतं तर परिस्थिती खूप वेगळी असती."


अण्णांना आंदोलन हाताळता आलं नाही : पृथ्वीराज चव्हाण 


मनमोहन सिंह सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अण्णा हजारेंना आंदोलन योग्य पद्धतीनं हाताळण्यात अपयश आल्यानं काँग्रेस आघाडीचे सरकार  कोसळलं. ते म्हणाले, "सरकार पडण्याचं कारण म्हणजे पूर्वीचे घोटाळे, 2जी... आम्ही अण्णांचे आंदोलन नीट हाताळलं नाही, त्यामुळेच काँग्रेसचं सरकार पडलं."