नवी दिल्ली :  केंद्र सरकारने आता भारतातील कोरोना व्हायरससाठी इंडियन व्हेरिएंट हा शब्द वापरण्यास सोशल मीडिया कंपन्यांना बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉरमवरुन इंडियन व्हेरिएंट हा शब्द काढून टाकावा असा आदेश केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला आहे. तशा प्रकारचे पत्र सर्व सोशल मीडिया कंपन्यांना देण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. 


 




इंडियन व्हेरिएंट या शब्दाच्या वापरामुळे चुकीची माहिती आणि संदेश जातो, तसेच या शब्दामुळे देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे इंडियन व्हेरिएंट या शब्दाचा वापर करु नये असा आदेश माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला आहे. 


केंद्रीय माहिती तंत्रज्ञाान मंत्रालयाने आपल्या पत्रात लिहिले आहे की, इंडियन व्हेरिएंट या शब्दाचा वापर हा चुकीचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसला B.1.617 व्हेरिएंट हा शब्द वापरला आहे. त्यांनी कुठेही इंडियन व्हेरिएंट या शब्दाचा वापर केला नाही. 


जागतिक आरोग्य संघटनेने 11 मे रोजी सांगितलं होतं की, भारतात गेल्या वर्षी कोरोनाचा  B.1.617 व्हेरिएंट हा प्रकार सापडला होता. तो चिंताजनक आहे. याचाच आधार घेऊन केंद्र सरकारने या आधी सांगितलं होतं की, माध्यमांमध्ये B.1.617 व्हेरिएंटसाठी इंडियन व्हेरिएंट  हा शब्द वापरण्यात येत आहे, जो चुकीचा आहे. 


आतापर्यंत 44 देशांमध्ये भारतात सापडलेला B.1.617 व्हेरिएंट पसरल्याचं समोर आलं आहे. इतर व्हेरिएंटच्या तुलनेत B.1.617 व्हेरिएंटचा प्रसार हा सुलभ आणि अत्यंत वेगाने होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे. तसेच या B.1.617 व्हेरिएंटमुळे मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं सांगितलं होतं. 


केंद्र सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत असून त्यामध्ये सरकार शब्दांच्या आधारे सोशल मीडियावरील सेन्सॉरशिपमध्ये वाढ केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. 


महत्वाच्या बातम्या :