मुंबई : सध्या इंडियन आयडॉलच्या चालू सीझनची मोठी चर्चा आहे. या सीझनमध्ये असलेले गायक वाहवा मिळवू लागले आहेत. पण त्याचवेळी गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडॉलचा बारावा सीझन टीकेचा विषय होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये आलेल्या अमितकुमार यांनी किशोरकुमार यांच्यावरच्या सादर झालेल्या गाण्यांवर नापसंती दर्शवली होती. आता पहिल्या इंडियन आयडॉलचा विजेता अभिजीत सावंतनेही या सीझनबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. 


अभिजीत सावंतने 2008 साली झालेला पहिला इंडियन आयडॉल शो जिंकला होता. सध्या सुरु असलेल्या शोबद्दल एका माध्यमाशी बोलताना तो म्हणाला, "रिअॅलिटी शो हे दु:खावर किंवा स्पर्धकाच्या गरिबीवर चालतात. त्यावर भर दिला जातो. त्याची स्टोरी केली जाते. पण अलिकडे शोमध्ये प्रेमप्रकरणांवर जास्त भर दिला जाताना दिसू लागला आहे. थेट उल्लेख न करता, स्पर्धकांना कोपरखळ्या मारल्या जातात. हिंदी प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यासाठी या शोमध्ये जास्तीत जास्त मसाला घातला जातो. पण आता या शोमध्ये तथ्य नसलेल्या प्रेमकहाण्या घातल्या जात आहेत. त्यात मसाला घातला जात आहे. स्पर्धकांना याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. खरंतर यापेक्षा गाण्यावर जास्त फोकस करायला हवा. ते जास्त महत्त्वाचं आहे." 


अभिजीत सावंतला किशोरकुमार यांच्यावर झालेल्या एपिसोडबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर बोलताना तो म्हणाला, "कोणत्याही गायकाची किशोरकुमार यांच्यासारख्या महान गायकासोबत तुलना करणं चूकच आहे."