नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. सकाळी साडेदहा वाजता या निकालाचं वाचन सुरु होणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावर्षी 5 ऑगस्टपासून निकालाची नियमित सुनावणी सुरु झाली होती. त्यानंतर जवळपास 40 दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.


सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात निकाल लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र उद्या सुट्टीच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याचं ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीचं घटनापीठ हा निकाल सुनावणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.



शनिवारी सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असते. मात्र अयोध्या प्रकरणातल्या ऐतिहासिक निकालासाठी शनिवारचीच वेळ निवडण्यात आली. कदाचित न्यायालयात गर्दी होऊ नये, परिस्थिती हाताळणं सुरक्षा यंत्रणांना सोपं जावं यासाठी शनिवारचा दिवस निवडण्यात आला असावा, अशी शक्यता आहे.


उद्याच्या निकालासाठी एक नंबरचं न्यायालय खुलं केलं जाणार आहे. न्यायालयात केवळ अयोध्या प्रकरणाशी संबंध असलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. 16 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांची भेट घेतली. यावेळी इतर अयोध्या प्रकरणाचा निकाल देणारे इतर न्यायमूर्तीही सहभागी होते. यावेळी सर्वांनी उत्तर प्रदेशातील सुरक्षेचा आढावा घेतला.


संबंधित बातम्या