मुंबई : गेल्या 500 वर्षांपासून ज्या क्षणाची सर्व जण वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आणि रामलला त्यांच्या मंदिरात (Ram Mandir) विराजमान झाले. गर्भगृहात रामललाची 51 इंचाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. रामललाच्या ज्या मूर्तीची स्थापना मंदिरात करण्यात आलीये, ती मूर्ती कर्नाटकाचे मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. ही मूर्ती शाळीग्रामच्या शिलांपासून तयार करण्यात आलीये ज्याला धार्मिक ग्रंथांमध्ये आणि शास्रांमध्ये विष्णुचे स्वरुप मानले जाते. 


दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलीये. पण असं असलं तरीही मंदिराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होणे अद्यापही बाकी आहे. त्यामुळे आता प्राणप्रतिष्ठापनेनंतर अयोध्येतील वातावरण कसं असणार, मंदिराचे बांधकाम कधी पूर्ण होणार याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


सामन्यांसाठी मंदिर कधीपासून खुले होणार?


राम मंदिरात सामान्य नागरिकांना 23 जानेवारी प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान दररोज दीड लाखांपेक्षा अधिक भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत येऊ शकतात. तसेच प्रत्येक भक्ताला रामललाचे दर्शन घेण्यासाठी फक्त 15 ते 20 सेकंदांचा अवधी दिला जातो. 


दर्शनाची वेळ काय?


श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, दर्शानाची वेळ ही सकाळ आणि संध्याकाळ एकूण साडे नऊ तासांसाठी खुले असणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 11.30 वाजेपर्यंत आणि पुन्हा दुपारी 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दर्शन घेता येऊ शकते. 


आरतीची वेळ काय असणार?


वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सकाळी 6.30 वाजता आणि संध्याकाळी 7.30 वाजता मंदिरात आरती करण्यात येईल. सकाळच्या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी एक दिवस आधी बुकींग करावे लागले. तसेच संध्याकाळच्या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी त्याच दिवशी बुकींग करु शकता. 


बुकींग कसं करता येणार?


आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पास जारी केले जातील. हे पास श्रीराम जन्मभूमीच्या कॅम्प ऑफिसमध्ये उपलब्ध होतील. आरती सुरु होण्याच्या अर्धा तास आधी आरतीचे पास उपलब्ध करुन देण्यात येतील. पण हे पास घेण्यासाठी तुम्हाला ओळखपत्र सोबत घेऊन जावे लागेल. तसेच तुम्ही वेबसाईटवरुन देखील पास घेऊ शकता. 


सगळ्यांसाठी पास उपलब्ध होणार ?


दरम्यान मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पास विनाशुल्क दिले जाणार आहेत. सध्या आरतीसाठी फक्त 30 पासच दिले जातील. हळूहळू या संख्येत वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. 


मंदिर कधीपर्यंत पूर्ण होणार?


राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षात मंदिराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होईल. तसेच 23 जानेवारीपासून उर्वरित काम उत्साहाने सुरु करण्यात येईल, असं देखील सांगण्यात आलं आहे. राम मंदिराचा संपूर्ण परिसर हा 70 एकरचा आहे. तसेच मुख्य मंदिराशिवाय 6 विविध मंदिरं देखील बनवण्यात आली आहे. इथे गणपती, अन्नपूर्णा, माता भगवती,शिव मंदिर आणि हनुमानाचे देखील मंदिर उभारण्यात आले आहे. 


राम मंदिराची रचना कशी आहे? 


अयोध्येतील राम मंदिर पारंपारिक नगर शैलीत बांधण्यात आले आहे. मंदिर 2.7 एकरावर बांधले आहे. तीन मजली असलेल्या या मंदिराची लांबी 380 फूट आणि उंची 161 फूट असणार आहे. मंदिराचे प्रवेशद्वार सिंह द्वार' असणार आहे. राम मंदिरात एकूण 392 खांब आहेत. गर्भगृहात 160 खांब आणि वर 132 खांब आहेत. मंदिरात 12 प्रवेशद्वार असतील. सिंह दरवाजातून मंदिरात प्रवेश करताच समोर नृत्य मंडप, रंगमंडप आणि गूढ मंडपही दिसेल. मंदिर परिसरात सूर्यदेव, भगवान विष्णू आणि पंचदेव मंदिरेही बांधली जात आहेत.


हेही वाचा : 


जय सिया राम! 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान, पंतप्रधान मोदींकडून विधीवत प्रतिष्ठापना