Ram Mandir Ayodhya Pran Pratistha : अवघ्या भारतवर्षाची प्रदीर्घ काळाची प्रतीक्षा आज संपली असून अयोध्येत राममंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर उपस्थितांचे चेहरे उजळल्याचं दिसून आलं. त्यामध्ये दोन चेहऱ्यांकडे अनेकांचं लक्ष होतं आणि ते म्हणजे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती (Uma Bharti) आणि साध्वी ऋतंभरा (Sadhvi Ritambhara) . या दोघींही या क्षणी भावुक झाल्या होत्या, त्यांनी एकमेकींना मिठी मारून आपला आनंद व्यक्त केला. 


अखंड भारत सध्या राममय झाला असून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दरवळ काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरल्याचं चित्र आहे. यावेळी यादरम्यान साध्वी ऋतंभराही काहीशा भावुक दिसल्या पण पुढच्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा या दोघांनीही राम मंदिर आंदोलनात महत्त्वाचे योगदान दिले आहे. या दोघांनी 1992 मध्ये कार सर्व्हिस केली होती.


कोण आहेत उमा भारती? (Who Is Uma Bharti)


उमा भारती या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री होत्या. उमा भारती या साध्वी असून त्यांनी साध्वी म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उमा भारती यांनी 1984 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. 1989 च्या निवडणुकीत त्या जिंकल्या. 1991 मध्ये त्यांनी मध्य प्रदेशमधील खुजराहो लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर त्यांनी सलग तीन वेळा ही जागा जिंकली. 


उमा भारती यांनी 1999 मध्ये भोपाळ मतदारसंघातून निवडणूक लढली आणि येथेही त्या विजयी झाल्या. उमा भारती यांनी वाजपेयी सरकारमध्ये अनेक मंत्रालये सांभाळली. 2003 मध्ये उमा भारती यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली.


कोण आहेत साध्वी ऋतंभरा? (Who Is Sadhvi Ritambhara)


साध्वी ऋतंभरा यांचा जन्म दोराहा, लुधियाना, पंजाब येथे झाला. लहानपणी त्यांचे नाव निशा असं होते. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी हरिद्वारच्या गुरु परमानंद गिरी यांच्याकडून दीक्षा घेऊन त्या साध्वी बनल्या आणि त्यांना ऋतंभरा हे नवीन नाव देण्यात आले. 


रामजन्मभूमीसाठी दोघींचा संघर्ष (Ayodhya Ram Mandir Protest History) 


रामजन्मभूमीसाठी उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांनी आंदोलन सुरू केले. याशिवाय जुलै 2007 मध्ये उमा भारती यांनी राम सेतू वाचवण्यासाठी आंदोलन केले होते. साध्वी ऋतंभराबद्दल सांगायचं झालं तर साध्वी ऋतंभरा या 1980 च्या दशकात राम मंदिर आंदोलनाचा मुख्य चेहरा बनल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हिंदू प्रबोधन मोहिमेची कमान हाती घेतली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली तेव्हा साध्वी ऋतंभरा तेथे होत्या. बाबरी विध्वंसातील 68 आरोपींमध्ये त्याचेही नाव होते.


ही बातमी वाचा: