नवी दिल्ली : अयोध्येतल्या राम मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा वापर केला जाणार नाही. हे मंदिर पुढची किमान हजार वर्षे भूकंप, वादळ यापासून सुरक्षित राहील अशा पद्धतीने बनवण्याचा मानस असल्याचं मंदिर ट्रस्टने म्हटले आहे. भूमीपूजनाचा सोहळा झाल्यानंतर मंदिराच्या कामाची पुढची लगबग सुरु झाली आहे. आज मंदिर ट्रस्टची एक महत्वाची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. त्यानंतर ट्रस्टच्या वतीनं काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.


भारताच्या प्राचीन बांधकाम शैलीचा वापर करुन हे मंदिर उभारलं जाणार आहे, जेणेकरुन ते अधिक वर्षे मजबुतीने टिकेल, असं ट्रस्टचे सचिव चंपतराय यांनी म्हटलं आहे. एल अँड टी कंपनीकडे या बांधकामाची जबाबदारी आहे. सध्या एल अँड टीचे इंजिनीअर हे आयआयटी चेन्नईच्या काही संशोधकांसह माती परीक्षणाचं काम सुरु करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


कधीपर्यंत पूर्ण होणार मंदिर?
या मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मंदिर कधीपर्यंत पूर्ण होणार याचीही चर्चा सुरु झाली आहे. त्याबाबत मंदिर ट्रस्टचे सचिव चंपतराय यांनी सांगितले की, "36 ते 40 महिन्यांचा कालावधी बांधकाम पूर्ण होण्यास लागू शकतो." त्यांच्या या वक्तव्यावरुन साधारणपणे 2024 च्या निवडणुकांच्या आधी या मंदिराचं काम पूर्ण होऊ शकतं असं दिसत आहे.


मंदिरासाठी तांब्याच्या प्लेट
या मंदिराच्या बांधकामात तांब्याच्या प्लेटचाही वापर केला जाणार आहे. या कामात 18 इंच लांब, 3 मिलीमीटर जाडी आणि 30 मिलीमीटर रुंद अशा 10 हजार तांब्याच्या प्लेटची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे याच मापाच्या तांब्याच्या प्लेट लोकांनी दान कराव्यात, असंही आवाहन ट्रस्टने रामभक्तांना केलं आहे. या तांब्याच्या पट्ट्यांवर दान करणारे आपल्या परिवाराचं, क्षेत्राचं, किंवा परिसरातल्या मंदिराचं नावही कोरुन पाठवू शकतात. देशभरातून अशा ताम्रपटया एकत्रित झाल्यास ते भारताच्या एकात्मतेचंही वेगळं उदाहरण ठरेल, असे ट्रस्टने म्हटलं आहे. शिवाय त्यानिमित्ताने संपूर्ण राष्ट्राचं योगदान मंदिर निर्मितीच्या कामात दिलं जाऊ शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.