नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी सोमवार 22 जानेवारी रोजी झालेल्या राम मंदिर (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण असा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली. संकटाच्या वेळी धैर्याने वागणे आणि सर्वांचे भले करणे हा भगवान रामाचा आदर्श आहे, असं देखील त्यांनी म्हटलं.
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, तुम्हा सर्वांना माहिती आहे की आज अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. हा ऐतिहासिक दिवस आहे. संयम बाळगणे, मोठ्यांचा आदर करणे, लहानांवर प्रेम करणे, सर्वांना बरोबर घेऊन चालणे, संकटसमयी धैर्याने वागणे, सदैव शिष्टाचार लक्षात ठेवणे आणि सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करणे हे प्रभू रामाचे आदर्श गुण आहेत. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे राष्ट्रपती मूर्मू यांना निमंत्रण देण्यात आले होते.
पुढे त्यांनी म्हटलं की, बालपणीच्या चांगल्या सवयी आयुष्यभर तुमच्या सोबत राहतात. या कारणास्तव, माझा तुम्हा सर्वांना सल्ला आहे की, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करा जेणेकरून पृथ्वीवर कमीत कमी दबाव येईल. नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर आणि संवर्धन तुमचे भविष्य सुधारेल.
द्रौपदी मुर्मू यांनी नेमकं काय म्हटलं?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, आमची मुले-मुली बहुमुखी प्रतिभेने समृद्ध आहेत. त्यांच्या समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची अफाट क्षमता आहे. त्यांना योग्य दिशा दाखविणे हे आपले कर्तव्य आहे जेणेकरून ते त्यांच्यातील प्रतिभा आणि उर्जेचा योग्य वापर करू शकतील. जेव्हा त्यांचे लक्ष चांगल्या कामांवर केंद्रित असेल तेव्हा ते त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतील. आजची मुलं टेक्नोसॅव्ही आहेत. तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकता हे उत्तम आहे, पण अनेकदा तंत्रज्ञानाचाही गैरवापर होतो.
हेही वाचा :
मी आज गाणार नाही, मला ट्रोल व्हायचं नाहीये; अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या?