Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू होणार आहे. मंदिर उभारणीचा पहिला टप्पा म्हणजेच व्यासपीठ पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यांतर्गत बुधवारपासून गर्भगृहाच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे. यावेळी गर्भगृहाची कोनशिला बसवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास, सरचिटणीस चंपत राय यांच्यासह सुमारे 250 संत, राजकीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. कोनशिला बसवल्यानंतर गर्भगृहाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल आणि जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात रामांची प्रतिष्ठापना केली जाईल, असं सांगण्यात येत आहे. 


सर्वोच्च न्यायालयाकडून राम मंदिराचा निर्णय 9 नोव्हेंबर 2019 रोजी आला असला तरी मंदिर उभारणीची तयारी 1989 पासून सुरू झाली होती. 1989 मध्ये, शिला पूजन / शिला न्याससह राम भक्तांकडून विटा मागविण्यात आल्या. पुढच्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 1990 मध्ये अयोध्येत विश्व हिंदू परिषदेची कार्यशाळा स्थापन झाली. या कार्यशाळेत गुलाबी दगड घेऊन मंदिराच्या बांधकामासाठी दगड कोरण्याचे काम सुरू करण्यात आले. पूर्वीच्या राम मंदिराच्या रचनेनुसार निर्णय येईपर्यंत 60 ते 65 टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर आराखड्यात बदल करून मंदिराची रचना मोठी करण्यात आली. अशातच आता दगडी बांधकामाचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे.


गुलाबी दगडांनी बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या गर्भगृहाचे काम बुधवारपासून सुरू होत आहे. हे गुलाबी दगड राजस्थानच्या भरतपूर येथील बन्सी पहाड येथील आहेत. त्यावर नगारा शैलीतील कलाकृती कोरल्या जात आहेत. पूर्वी या दगडांचे काम पूर्णपणे हाताने केले जात होते. परंतु आता मंदिर उभारणीचे काम वाढले आहे, त्यामुळे आता यंत्रांचा वापर केला जातो. मंदिराची जुनी रचना 128 फूट उंची, 140 फूट रुंदी आणि 255 फूट लांबीची होती. मात्र, रचनेत बदल केल्यानंतर आता मंदिराची उंची 161 फूट, रुंदी 255 फूट आणि लांबी 350 फूट होणार आहे. मंदिरात एकूण 4 लाख घनफूट दगड बसवण्यात येणार आहेत. पूर्वीच्या डिझाइनमध्ये एक लाख 75 हजार घनफूट दगड वापरण्यात येणार होता.