Ayodhya land dispute case | दोन हजार वर्षांपूर्वी वादग्रस्त जमिनीवर भव्य राममंदिर होते, रामललाच्या वकिलांचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2019 06:28 PM (IST)
भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण (ASI) विभागाने हायकोर्टाच्या आदेशानुसार खोदकाम केले होते. या रिपोर्टमध्ये विभागाने या जागेवर जी इमारत होती ती उत्तर भारतीय शैलीमध्ये बनवलेले एक मंदिर होते, असे वैद्यनाथन यांनी सांगितले.
नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सातव्या दिवशी सुनावणी झाली. आज रामललाच्या वकिलांनी नकाशे, छायाचित्र आणि पुरातन काळातील पुरावे देत दोन हजार वर्षांपूर्वी या वादग्रस्त ठिकाणी भव्य राम मंदिर होते असा दावा केला आहे. मंदिराच्या वरील भागावर वादग्रस्त इमारत तयार केली गेली. प्राचीन मंदिरांचे खांब आणि अन्य सामग्रीचा उपयोग या इमारतीच्या निर्मिती प्रक्रियेत केला आहे. अशा प्रकारची इमारत ही शरियतनुसार मशीद होऊच शकत नाही, असे रामललाचे वकील सी एस वैद्यनाथन यांनी म्हटले. सुनावणीच्या सुरुवातीला 1950 साली फैजाबादचे कोर्ट कमिश्नर यांनी तयार केलेला नकाशा दाखवत वकील सी एस वैद्यनाथन यांनी आपली बाजू मांडायला सुरुवात केली. या नकाशामध्ये स्पष्ट दिसत आहे की, वादग्रस्त भागामध्ये हिंदू विधीनुसार पूजा करत आहेत, असे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी या भागाची 1990 मध्ये घेतलेली छायाचित्रं कोर्टाच्या समक्ष ठेवली. हा भाग ज्या खांबांवर बनवला गेला होता, त्यावर तांडवमुद्रेत शिव, हनुमान आणि कमळासोबत सिंहाच्या मध्ये बसलेली गरुडाची प्रतिमा असल्याचे त्यांनी कोर्टाला दाखवले. वैद्यनाथन म्हणाले की, अशा प्रकारच्या प्रतिमा इस्लामिक नाहीत. अशी प्रतीकं असणाऱ्या इमारतींना मशीद म्हणत नाहीत. वैद्यनाथन पुढे म्हणाले की, या स्थानावर राम जन्मभूमी असल्याबाबत हजारो वर्षांपासून हिंदू धर्मीयांमध्ये आस्था आहे. या जागेवर हिंदू धर्मीय पूजा करत होते. काही वर्ष नमाज पठण करून कुठलीही जागा मशीद बनू शकत नाही. अनेकदा रस्त्यांवर नमाज पठण केले जाते. केवळ नमाज पठण केल्याने त्या जागेला मशिदीचा दर्जा मिळत नाही, असे वैद्यनाथन म्हणाले.