नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुरु अयोध्या प्रकरणावर सहाव्या दिवशी सुनावणी झाली. रामलल्लाचे वकील सी ए वैद्यनाथन यांनी धार्मिक ग्रंथ, विदेशी यात्रेकरुंचे लेख आणि पुरातन काळातील पुराव्यांच्या आधारे विवादित जमिनीवर हिंदूंचा हक्क असल्याचा दावा केला. पाच न्यायमूर्तींच्या पीठाने पक्षकारांचं बोलणं ऐकलं आणि काही प्रश्नही विचारले.


वैद्यनाथन यांनी स्कंद पुराणातील गोष्टीने सुरुवात केली. सरयू नदीत स्नान करून राम जन्मभूमीचं दर्शन घेतल्याने पुण्य मिळतं, असं पुराणात लिहिलं आहे. यावर न्यायमूर्ती एस ए बोबडे यांनी विचारलं की, पुराणातील कथा कधी लिहिल्या गेल्या? त्यावर वैद्यानाथ यांनी सांगितलं की, महर्षी वेदव्यास यांनी महाभारत कालखंडात त्याचं लिखाण केलं आहे.


विदेशी यात्रेकरुंनी लिहिलेल्या पुस्तकांचाही उल्लेख वैद्यनाथन यांनी केला. सर्वात आधी 1608 ते 11 दरम्यान अनेकदा अयोध्येला जाणाऱ्या इंग्रज व्यापारी विलियम फिंचच्या लेखाची माहिती वैद्यानाथन यांनी दिली. फिंच यांनी विवादित जागेवर मशिदीचा उल्लेख कुठेही केलेला नाही. त्यांनी तेथे जन्मभूमीचा उल्लेख केला आहे. तसेच या ठिकाणाहून जाणाऱ्या जोसेफ टाईफेनथेलर, मोंटगोमरी मार्टिन यांनीही हिंदूंची आस्था असलेलं ठिकाण, असा या जागेचा उल्लेख केल्याचं, वैद्यनाथन यांनी सांगितलं.


या विदेशी प्रवाशांकडे खोटं बोलण्याचं कोणतंही कारण नव्हतं. त्यांनी जे पाहिलं, ते त्यांनी लिहिलं. बाबरने लिहिलेल्या बाबरनामा या पुस्तकातही मशिदीच्या बांधकामाचा कुठेही उल्लेख नाही. यावरुन असा प्रश्न पडतो की त्याठिकाणी अयोध्यातील विवादित जागेवर मशिद कुणी बांधली. औरंगजेब किंवा इतर कुणी याठिकाणी मशिद उभारली तर नाही? मात्र याबाबतही कोणता उल्लेख कुठे आढळत नाही.


यावर मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी म्हटलं की, बाबरनामामध्ये मशिदीच्या निर्मितीचा उल्लेख नाही, असं बोलू नाही शकत. कारण पुस्तकाची दोन पानं उपलब्ध नाहीत. यामध्ये मशिदीचा उल्लेख असू शकतो. यावर न्यायालयाने वैद्यनाथन यांना विचारलं की, बाबरी मशिदचा उल्लेख कधी करण्यात आला.


त्यावर हिंदूचे वकील वैद्यनाथन यानी सांगितलं की, विवादित जागेचा उल्लेख पहिल्यांदा 18 व्या शतकात आढळतो. 1838 मध्ये एका पुस्तकात मशिद बाबरने बांधल्याचा उल्लेख आढळतो.


त्यानंतर वैद्यनाथन यांनी 1854 च्या ईस्ट इंडिया कंपनीच्या गजेटियरचा दाखला दिला. गजेटियरमध्येही अयोध्या भगवान राम यांचा किल्ला असल्याचं म्हटलं आहे. 1862 मध्ये पहिल्यांदा अयोध्यामध्ये अलेक्झांडर कनिंघम यांच्या नेतृत्वात पुरातत्व सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये विवादित जागेवर हिंदू मंदिराचे अवशेष आढळल्याचे पुरावे आहेत, असं वैद्यनाथन यांनी सांगितलं.


वैद्यनाथन यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर 1991 चा व्हिडीओ दाखवला. त्या व्हिडीओत दिसत आहे की इमारत हिंदू मंदिराच्या 14 खांबावर उभारण्यात आली. या खांबांवर तांडव मुद्रेत शंकर, हनुमान यांसह अनेक हिंदू देवांच्या कलाकृती साकारण्यात आल्या होत्या. मंदिरावर जबरदस्तीने बनवण्यात आलेली ती इमारत शरीयतनुसार मशिद मानली जाणार नाही, असं वैद्यनाथन यांनी सांगितलं.


सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी एक प्रश्न विचारला. अयोध्येत हिंदूंव्यतिरिक्त बौद्ध, जैन आणि मुस्लिमांचं अस्तित्व होतं. मात्र तुम्ही एकटे त्याठिकाणी दावा कसा करु शकता? त्यावर बोलताना वैद्यनाथन यांनी म्हटलं की, बौद्ध आणि जैन धर्मातील अनेक तत्व एकत्र करुन हिंदू धर्म पुन्हा स्थापन करण्यात आला. महाराजा विक्रमादित्य यांनी अयोध्येला पुन्हा शोधून काढलं आणि तेथे मंदिर बांधलं. हजार वर्षांनंतरही हिंदूंच्या आस्था बदलल्या नाही. ते जन्मभूमीची पूजा करत राहिले. हजारो वर्षांपासून सुरु असलेल्या या आस्थेला आता कोर्टाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे, असं वैद्यनाथन यांनी सांगितलं.