Russia-Ukraine War: एअर इंडियाने दिल्ली ते मॉस्कोची उड्डाणे स्थगित केली आहेत. आधीपासून नियोजित असलेली उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने रशियन दूतावासाला सांगितले आहे की, ते रद्द केलेल्या विमानाच्या प्रवाशांना त्यांचे तिकिटाचे पूर्ण पैसे परत करणार आहेत. रशियाच्या आकाशात आणि आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींमुळे तिथल्या प्रवाशांना धोका निर्माण झाल्याचे सांगत ही विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मात्र गेल्या महिनाभरापासून हा धोका होता, आता अचानक उड्डाणे का रद्द करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर याचे कारण आंतरराष्ट्रीय विमा संस्थांचे आकलन असल्याचे सांगण्यात येत आहे.


विम्याअभावी उड्डाणे रद्द


रशियन आकाशात उड्डाण करताना धोका लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय विमा एजन्सींनी मॉस्कोला जाणार्‍या किंवा तेथून येणाऱ्या विमानांवर विमा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एअर इंडियाने त्यांची मॉस्को उड्डाणे थांबवली आहेत.


एअर इंडिया मॉस्कोला आठवड्यातून दोन उड्डाणे चालवते


आतापर्यंत एअर इंडियाची दिल्लीहून मॉस्कोला आठवड्यातून दोन उड्डाणे होती. एअर इंडियाने रशियन दूतावासाला कळवले आहे की, ते सर्व प्रवाशांना त्यांच्या तिकिटांचा परतावा देईल. या संबंधित एबीपी न्यूजच्या प्रश्नावर एअर इंडियाने उड्डाणे स्थगित करण्याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही.


मॉस्कोला जाण्यासाठी ट्रान्झिट मार्ग उपलब्ध 


सध्याच्या परिस्थितीत मॉस्कोला जाण्यासाठी ट्रान्झिट मार्गांचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी प्रवाशांना मॉस्को ते दिल्ली दरम्यान ताश्कंद, इस्तंबूल, दुबई, अबू धाबी, दोहा आणि इतर देशांतून प्रवास करावा लागेल.


युक्रेनमध्ये युद्धामुळे परिस्थिती भयावह 


युद्धाच्या काळात युक्रेनमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. युक्रेनचे लोक आपल्या बचावण्यासाठी बंकरमध्ये आश्रय घेऊन बसले आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये सर्वत्र नासधूस झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, युक्रेन सरकारने रशियावर नरसंहाराचा आरोप केला आहे. तर क्रेमलिनने हे आरोप फेटाळत म्हटले आहेत की, रशियन सैन्य कधीही नागरिकांना लक्ष्य करत नाही.