IPS Officer Shiladitya Chetia: नवी दिल्ली : आसामचे (Aasam) गृहसचिव शिलादित्य चेतिया (IPS Officer Shiladitya Chetia News) यांच्या पत्नीचं मंगळवारी निधन झालं. त्या गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी (Cancer) झुंज देत होत्या. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही मिनिटांतच चेतिया यांनी रुग्णालयात आत्महत्या केल्याचं माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया, 2009 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी, यांनी एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) त्यांच्या अधिकृत रिव्हॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडली आणि आत्महत्या केली. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला, त्याच ठिकाणी चेतिया यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 


आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर रुग्णालयात आत्महत्या केल्यानं आसामसह संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी गुवाहाटी येथील एका खासगी रुग्णालयात आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या पत्नीचं मंगळवारी दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या पत्नी ब्रेन ट्युमरनं त्रस्त असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. 


एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, चेतिया, 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी आयसीयूमध्ये त्यांच्या सर्व्हिस पिस्तूलनं स्वतःवर गोळी झाडली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. राज्याचे गृह सचिव म्हणून नियुक्तीपूर्वी, शिलादित्य चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे एसपी आणि आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून काम केलं होतं.


त्याचवेळी आसाम पोलिसांचे डीजीपी जीपी सिंह यांनी ट्विटरवर पोस्ट करत आसामनचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी आज संध्याकाळी आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. काही मिनिटांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची घोषणा केली होती, ज्या दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होत्या. संपूर्ण आसाम पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. 




कोण होते शिलादित्य चेतिया? 


आसाम ट्रिब्यूननं दिलेल्यानुसार, 2009 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी शिलादित्य चेतिया हे गेल्या चार महिन्यांपासून रजेवर होते. बहुधा ते आपल्या पत्नीच्या आजारपणामुळे निर्माण झालेल्या समस्यांशी झुंज देत होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. आसाम सरकारमध्ये सचिव होण्यापूर्वी शिलादित्य चेतिया यांनी राज्याच्या तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणून काम केलं होतं.


नेमकं घडलं काय? 


मिळालेल्या माहितीनुसार, आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी प्रदीर्घ आजारामुळे पत्नीच्या निधनानंतर मंगळवारी गुवाहाटी येथील एका खासगी रुग्णालयात आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतिया यांनी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये त्यांच्या अधिकृत रिव्हॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडली. जिथे त्यांनी स्वतःवर गोळी झाडली, त्याच ठिकाणी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, चेतिया यांच्या पत्नीला ब्रेन ट्यूमरचं निदान झालं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून त्या या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याच ठिकाणी चेतिया यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.