Assam Floods Update: आसाममध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील जनजिवन विस्कळीत झालेय. मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. पूरस्थितीमुळे लाखो लोकांना घरदार सोडावं लागत आहे. आतापर्यंत पावसामुळे आणि दरड कोसळून तब्बल 186 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण बेपत्ता आहेत. आसाममधील 16 जिल्ह्यातील जवळपास 11 लाख लोकांना या पूरस्थिताचा फटका बसलाय.
पुरामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यानं, नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं देखील कठीण झाल आहे. दरम्यान, भारतीय लष्कराकडून सातत्याने मदत आणि बचावकार्य सुरु आहे. घरामध्ये पाणी गेल्यामुळे संसार उघड्यावर आलाय. नागरिकांची तारांबळ उडाली असून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकजण रस्त्यावर आले आहेत. बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, कचरा, दारंग, धेमाजी, भुबरी, कार्बी, कोकराजसह अनेक जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ पथक कसोशीने प्रयत्न करतेय. अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
बारपेटा भागात सर्वाधिक नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, बारपेटा, नागाव आणि कचर येथे पुराचा सर्वाधिक फटका बसला असून लाखो लोक प्रभावित झाले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कचारमधील सिल्चर आणि कामरूपमधील पूरजन्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला.
2 हजार 774 जनावरे पाण्यात वाहून गेली
आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळं 79 रस्ते आणि पाच पुलांचं मोठं नुकसान झालं आहे. तर सहा बंधारे तुटले आहेत. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अजूनही पाण्याखाली आहे. आतापर्यंत 2 हजार 774 जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता आमिर खान यानं या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख रुपयांची देणगी दिली.
पंतप्रधान काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून आसामला पुराच्या रूपात मोठी आव्हाने आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमंता जी आणि त्यांचा चमू मदत आणि बचावासाठी रात्रंदिवस काम करत आहे. वेळोवेळी तिथल्या बर्याच लोकांशी याबद्दल माझे बोलणे सुरु असते. मुख्यमंत्र्यांशीही संवाद सूरु असतो. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी एकत्र काम करत आहे.