Assam Floods : ईशान्य भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण पूराशी सध्या आसामवासीय संघर्ष करत आहेत. या भीषण पुरामुळे आसाम गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावरही आसाममधील या भीषण परिस्थीतीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या पुरामुळे तब्बल 21 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. तर, मृतांची संख्या 134च्या वर गेली आहे आणि लाखो लोक अजूनही संकटात आहेत. आसामला मदतीची नितांत गरज आहे. समाजातील प्रत्येकजण आसाममधील मदतकार्यासाठी आणि तेथील लोकांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी पुढे येत आहे. यात आता बॉलिवूडनेही हातभार लावला आहे. आमिर खान (Aamir Khan) , अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अनेक कलाकारांनीही यासाठी देणगी दिली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर आसाममधील पूरपरिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सीएम रिलीफ फंडात बॉलिवूडच्या विविध व्यक्तींनी देणगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी आमिर खानचे आभार मानताना लिहिले की, ‘प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी सीएम रिलीफ फंडात 25 लाखांचे योगदान देऊन आपल्या राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच्या या काळजीबद्दल आणि मदतीबद्दल मनापासून आभार.’
पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, ‘बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सीएम रिलीफ फंडात 5 लाखांचे योगदान देऊन आसाममधील पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या काळजीबद्दल आणि मदतीबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’ भूषण कुमार यांनीही सीएमआरएफला 11 लाख रुपयांची देणगी दिली आणि सोनू सूदनेही 5 लाख रुपयांचे योगदान दिले आहे.
दरम्यान आता आसाममधील पूरस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. बहुतेक नद्यांची पाणी पातळी आता ओसरली आहे. मात्र, या पुरात राज्यभरातील 22 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. यात, कचार जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिलचरमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. कारण, तेथील अनेक भागात अजूनही पाणी साचले आहे, असे पीटीआयने म्हटले आहे.
हेही वाचा :