नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरु आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा तरुण असावा असं अनेकांचं मत आहे तर अनेकजण ज्येष्ठ नेत्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्यावर ठाम आहेत. अध्यक्षपदासाठी काही नावं पुढं येत असली तरी नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी बंद लिफाफ्यात नावं देण्याच्या सूचना महासचिवांना देण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचे महासचिव  के सी वेणुगोपाल यांनी पक्षाच्या सर्व राष्ट्रीय अध्यक्षांना अध्यक्षपदासाठी चार-चार नावं बंद लिफाफ्यात द्यावीत अशा सूचना सर्व महासचिवांना दिल्या आहेत.  महासचिवांकडून आलेल्या या नावानंतर यावर काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांची मत देखील विचारात घेतली जातील.

या सूचनेनंतर सर्व महासचिवांनी या नव्या फॉर्म्युल्याअंतर्गत नावं पाठवायला सुरुवात केली आहे. सर्व महासचिवांकडून नावं आल्यानंतर  केसी वेणुगोपाल हे यामधील सर्वात लोकप्रिय चार नावं कमिटीला कळवणार आहेत.  त्यानंतर वर्किंग कमिटीचे सदस्य यावर चर्चा करणार आहेत.

यानंतर सर्व महासचिवांसोबत कमिटीतील सदस्य नव्या संभावित नावावर चर्चा करतील. एका नावावर सहमती झाल्यानंतर पुन्हा वर्किंग कमिटीची बैठक होईल.

याआधी ज्येष्ठ तसेच युवा नेत्यांनी दोन दोन वेळा बैठका घेऊन अध्यक्षपदावर चर्चा केली आहे. परंतु कुठल्याही एका नावावर सहमती होऊ शकलेली नाही. म्हणून आता या नव्या पर्यायाचा उपयोग करून अध्यक्षाची निवड केली जाण्याची शक्यता आहे.  मात्र या प्रक्रियेला देखील काँग्रेसमधील कहाणी नेत्यांचा विरोध आहे. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांनी या आधीच गांधी परिवारातील कुणीही व्यक्ती या प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे.



ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून तरुण नेत्याला पक्षाचे नेतृत्व देण्याची मागणी
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुढचा अध्यक्ष कोण? यावरून खलबते रंगली आहेत. ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून तरुण नेत्याला पक्षाचे नेतृत्व द्यावे अशी मागणी काँग्रेसच्या एका गटातून पुढे येऊ लागली आहे. अध्यक्षपदासाठी सध्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत. मात्र शिंदे यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ चेहऱ्यांना काँग्रेसमधून विरोध होऊ लागला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री सिंह यांनी युवा नेत्याला नवा अध्यक्ष बनवा, अशी मागणी केली आहे. ज्येष्ठांनी युवा नेत्यांसाठी मार्ग खुला करावा असेही त्यांनी म्हटले आहे. देशव्यापी ओळख आणि जमिनीशी नाळ जुळलेल्या युवा नेत्याला ही जबाबदारी द्यावी, असे सिंह यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडे कोण आहेत नवीन युवा चेहरे   
कॅप्टन यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस पक्षात नवीन युवा नेतृत्व कोण? यावर चर्चा देखील सुरु झाली आहे. यामध्ये मुख्यत्वे सचिन पायलटआणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. पायलट सध्या  राजस्थानचे  उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर शिंदे पक्षाचे महासचिव असून त्यांच्याकडे पश्चिम उत्तरप्रदेशची जबाबदारी आहे. मुकुल वासनिक यांचेही नाव या यादीत आहे. ते सध्या पक्षाचे महासचिव आहेत.  प्रियांका गांधी यांच्या नावावर सध्या तरी चर्चा केली जात नाही. राहुल गांधींच्यानंतर पक्षाचा अध्यक्ष हा गांधी परिवाराच्या बाहेरील अध्यक्ष असावा, अशी खुद्द गांधी परिवाराची इच्छा आहे. नव्या अध्यक्षांच्या निवडीत माझी कुठलीही भूमिका नसेल, असे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची माळ सुशीलकुमार शिंदेंच्या गळ्यात पडण्याची शक्यता
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षपदाची माळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे. शिंदे हे गांधी परिवाराच्या मर्जीतले सहकारी मानले जातात. सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत शिंदे यांचेच नाव आघाडीवर आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला पहिल्यांदाच सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने काँग्रेस अध्यक्षपदाचा मान मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या
काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण? सस्पेन्स संपेना, राहुल गांधींसाठी निष्ठावानांकडून प्रयत्न सुरुच

कुठल्याही स्थितीत राजीनामा मागे घेणार नाही, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत राहुल गांधींची बैठक, नाना पटोले यांचा राजीनामा